वाळवा तालुक्यातील सुरुल येथील २५-१५ योजनेतून केलेला रस्ता उद्घाटन होण्यापूर्वीच उखडला आहे. तेथील सरपंचांनी शुक्रवारी थेट गुडेवार यांच्याकडे तक्रार केली. त्यावर गुडेवार यांनी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. संबंधित ठेकेदार आणि कामाचे निरीक्षण करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना देत त्यांनी कानउघाडणी केली. सुरुल गावामध्ये दोन महिन्यांपूर्वी झालेला रस्ता आता उखडला आहे. खडी रस्त्यावर पडली आहे. निरीक्षक, ठेकेदाराचा सत्कार का नाही केला? असा जाब विचारला. एकमेकांना पाठीशी घालून खेळ करत असल्याबद्दल कानउघाडणी केली. तातडीने कारवाई झाली नाही, तर कारवाईला तयार रहा, अशा शब्दांत दम दिला. कोणत्याही कामात हयगय सहन केली जाणार नाही. ठेका कमी दराने घेतला असेल किंवा जास्त दराने घेतला असेल, काम गुणवत्तेचे झालेच पाहिजे, अशी आग्रही भूमिका कायम असल्याचे गुडेवार यांनी स्पष्ट केले.
चौकट
भिलवडीत ठेका एकाकडे, काम दुसऱ्यानेच पूर्ण केले
भिलवडी (ता. पलूस) येथील बंदिस्त गटारीचे ३ लाख २२ हजार ६६७ रुपयांचे काम बुधगाव (ता. मिरज) येथील भास्कर लक्ष्मण खांबे या सुशिक्षित बेरोजगार अभियंत्याला मिळाले होते. हा ठेकेदार तिथे काम करण्यासाठी गेले असता, त्यांना दमबाजी झाली होती. तसेच संबंधित गटारीचे काम दुसऱ्याच ठेकेदाराने पूर्ण केल्याचेही दिसून आले. याबाबत ठेकेदार खांबे आणि स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष सुनील फराटे यांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेकडे तक्रार केली आहे.