तासगाव : सैनिक प्राणांची आहुती देतात म्हणून देशाच्या सीमा आणि आपण नागरिक सुरक्षित असतो. याची जाणीव ठेवून तरुणांनी त्यांचे सदैव स्मरण ठेवावे, असे आवाहन माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी वडगाव-रामपूर (ता. तासगाव) येथे मंगळवारी केले.वीर जवान शहीद उमाजी शिवाजी पवार यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार सुमनताई पाटील होत्या. घोरपडे म्हणाले, ज्या कुटुंबातील जवानांना देशासाठी वीरमरण येते, त्यांचे देशावर खूप मोठे उपकार आहेत. उमाजीच्या मृत्यूनंतरही या गावचे ग्रामस्थ त्याच्या स्मृतीची जपणूक करत आहेत. त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे म्हणाले, सैनिकांच्या बलिदानामुळे आपण पाकिस्तान विरुद्धची तीनही युद्धे जिंंकली. आता त्यांच्या स्वप्नातील भारत घडवणे ही आपली जबाबदारी आहे. वडगावच्या भूमीने देशासाठी दिलेले योगदान खूप मोठे आहे. मला विश्वास आहे की यापुढील काळातही देशाच्या संरक्षणात वडगावचे जवान मोलाची भूमिका बजावतील. सुरेशभाऊ पाटील म्हणाले, वीर जवानांचा स्मृतिदिन साजरा करण्यापेक्षा त्यांच्या स्मृती चिरंतन जिवंत रहाव्यात, यासाठी काही तरी करणे ही काळाची गरज आहे. वडगावच्या ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा. आमदार सुमनताई पाटील आणि आर. आर. आबा यांचे पूर्ण कुटुंब तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहील. कमांडो अॅकॅडमीचे संजय पाटील, पाटगाव (ता. मिरज) च्या संचालिका अर्चना शिंदे, वडगावचे डी. व्ही. नाना पाटील यांनी भाषणातून शहीद उमाजी पवार यांना श्रद्धांजली वाहिली. तत्पूर्वी सकाळी आळंदी देवाची येथील विनोदभूषण अदिनाथ महाराज लाड यांचे प्रबोधनपर कीर्तन झाले. आमदार सुमनताई पाटील यांच्याहस्ते वीरमाता सुनीता पवार यांचा, तर अजितराव घोरपडे यांच्याहस्ते वीर पिता शिवाजीराव पवार यांचा सत्कार करण्यात आला. माजी पंचायत समिती सभापती संजय पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी एनएसजीच्या कमांडोसह वडगाव ग्रामस्थ, कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन शहीद उमाजी पवार व शहीद महादेव पाटील युथ फौंडेशन, धनंजय स्पोर्ट्स जाखापूर, ग्रामपंचायत वडगाव व ग्रामस्थ यांच्यासह कमांडो करिअर अॅकॅडमी (सोनी-पाटगाव) यांनी केले. (वार्ताहर)स्मृतिस्थळाच्या निधीसाठी प्रयत्न करणार : अनिल बाबर आमदार अनिल बाबर म्हणाले, वडगावचे एक, दोन नव्हे, तर तब्बल चार जवान देशासाठी शहीद झाले आहेत. त्यांच्या बलिदानाने गावाचे नाव देशाच्या काना-कोपऱ्यात गेले. ही भूमी वंदनीय आहे. शासनाने सैनिकांच्या स्मृतिस्थळासाठी निधीची तरतूद करावी. यासाठी स्वत: प्रयत्न करणार आहे. वडगावच्या भूमीने देशासाठी दिलेले योगदान खूप मोठे आहे. याचे सदैव स्मरण ठेवणे आवश्यक आहे. देशाच्या संरक्षणात वडगावचे जवान यापुढेही मोलाची भूमिका बजावतील.
सूर्यकांता अजमेरा यांचे निधन
By admin | Published: December 01, 2015 11:41 PM