सांगली : शिक्षक संघ हा घटनाबद्ध असून कोणाचीही एकाधिकारशाही चालणार नाही. संघटनेचे सभासद ती खपवूनही घेणार नाहीत. जिल्ह्याचे नेतृत्व ठरविण्याचा अधिकार तालुकाध्यक्षांना व राज्याचे नेतृत्व ठरविण्याचा अधिकार जिल्हाध्यक्षांना असतो. त्यामुळे नऊ तालुका अध्यक्षांनी निवडलेली कार्यकारिणीच अधिकृत असल्याचे स्पष्टीकरण शिक्षक महासंघ जुनी पेन्शन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी दिले.
ते म्हणाले की, शिक्षक संघाची नवी जिल्हा कार्यकारिणी नुकतीच निवडण्यात आली आहे. नऊ तालुकाध्यक्षांनी तसा एकमुखी निर्णय घेतला. राज्य संघाच्या सदस्या सुनीता पाटील यांच्या उपस्थितीत ही निवड झाली. त्यामुळे घटनेनुसार हीच समिती अधिकृत आहे. जिल्ह्याने नेतृत्व नाकारलेल्या माजी अध्यक्षांनी आम्हाला शिकवू नये.
ते म्हणाले की, मुकुंद सूर्यवंशी यांच्याविषयी पदाधिकाऱ्यांत नाराजी होती. येलूरमधील बैठकीत सर्व तालुकाध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली, सूर्यवंशी यांची जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टीचा ठराव एकमताने घेतला. पण संघटनेची बदनामी टाळण्यासाठी सन्मानाने राजीनाम्याचा निरोप त्यांना दिला होता. हकालपट्टीच्या भीतीने व संघटनेच्या बदनामीसाठी सरचिटणीस अमोल माने यांनी कोणालाही विश्वासात न घेता बिनबुडाचे आरोप करत हकालपट्टी केल्याच्या बातम्या दिल्या.
पाटील म्हणाले की, सूर्यवंशी यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा गैरवापर करून एकाधिकारशाही पद्धतीने माने यांच्यावर कारवाई केल्यानेच जुनी कार्यकारिणी तालुकाध्यक्षांनी बरखास्त केली. सूर्यवंशी आठ वर्षांपासून जिल्हाध्यक्ष पदावर होते. त्यांच्या निष्क्रियतेमुळे संघटनेचा मोठा तोटा झाला आहे. त्यांच्यावर नाराज होऊन शिक्षक बँकेच्या गेल्या निवडणुकीत एकवीस उमेदवारांपैकी अकराजण दुसऱ्या संघटनेत गेले. कार्यकर्त्यांत वाद निर्माण करणे, जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांविरुद्ध वैयक्तिक स्वार्थापोटी बातम्या देणे, शिक्षकांत चुकीच्या गोष्टी पसरवणे, घरातील वैयक्तिक मतभेद संघटनेमधील कार्यकर्त्यांना सांगून भेद निर्माण करण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यामुळेच तालुकाध्यक्षांनी त्यांना धडा शिकविला. त्यांनी आता संघटनेची बदनामी थांबवावी, अन्यथा कायदेशीर कारवाई करावी लागेल.
--------------