सांगली : शहरातील एका उपनगरातील महिलेशी संपर्क वाढवत, पहिले लग्न झाले असतानाही तिच्याशी दुसरे लग्न करत, तिची १८ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पीडितेने रितेश रवींद्र सूर्यवंशी (रा. हुडको कॉलनी, सावरकरनगर, नाशिक) याच्याविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, २०१८ ते आतापर्यंत मुंबई, मनमाड, येवला आणि सांगली येथे हा प्रकार घडला. पीडिता ही शहरातील एका उपनगरात राहण्यास आहे. ती बहरीन येथे असताना तिने संशयित सूर्यवंशी याला सहा लाख रुपये ऑनलाइन पद्धतीने पाठविले होते. त्यानंतरही तिने दोन लाख २२ हजार ७६१ रुपये पाठविले. ही रक्कम संशयिताने परत न देता पीडितेची फसवणूक केली.
यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून शहरातील एका हॉटेलवर तिच्याशी अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवले. यानंतर येवला (जि. नाशिक) येथे तिच्याशी गोड बोलून त्याने सोने मागून घेतले होते. संशयित सूर्यवंशी याचे पहिले लग्न झाले असतानाही पीडितेशी लग्न करून त्याने मनमाड येथे तिला शारीरिक व मानसिक त्रास दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.