सांगली : शहरातील गारपीर चौक परिसरात पूर्ववैमनस्यातून तरुणावर खुनी हल्ला करणारा आणि तब्बल २४ गुन्हे दाखल असलेल्या संशयितास पोलिसांनी जेरबंद केले. श्रीकृष्ण उर्फ गोट्या शंकर कलढोणे (वय २५, मूळ रा. देशिंग, ता. कवठेमहांकाळ, सध्या रा. इंदिरानगर, सांगली) असे संशयिताचे नाव आहे.रविवार, दि. २ जुलै रोजी गारपीर चौक परिसरात आफताब मन्सूर जित्तीकर याच्यावर पूर्ववैमनस्यातून हल्ला करण्यात आला होता. यात कलढोणेसह त्याच्या सात साथीदारांनी आफताबवर हल्ला केला होता. सांगली शहर पोलिस ठाण्यातील पथक याचा तपास करत होते. यावेळी पथकाला माहिती मिळाली की, रेकाॅर्डवरील गुन्हेगार असलेला कलढोणे हा हनुमाननगर येथील बन्ने फार्महाऊसजवळ थांबला आहे. पथकाची कुणकुण लागताच तो शेतात पळून गेला. पोलिसांनी पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले. कलढोणे यास न्यायालयात हजर केले असता, त्याला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनाविण्यात आली आहे.सांगली शहरचे पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विनायक शिंदे, संदीप पाटील, सचिन शिंदे, झाकीरहुसेन काझी, गुंडोपंत दोरकर, गौतम कांबळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
सांगलीत तब्बल २४ गुन्हे दाखल असलेला संशयित खूनीहल्लाप्रकरणी जेरबंद
By शरद जाधव | Published: July 21, 2023 6:05 PM