लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : इस्लामपूर-कापूसखेड रस्त्यावरील ओसवाल प्लॉट परिसरातून मदिना कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर झालेल्या गवंड्याच्या खून प्रकरणातील संशयितांना अटक करण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. आर्थिक देवघेव किंवा मृताकडील पैसे लुबाडण्याच्या उद्देशाने ही घटना घडली असल्याचा कयास पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच अन्य कोणते कारण आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.
राजेश सुभाष काळे (वय ३५, रा. नेहरूनगर, इस्लामपूर) असे खून झालेल्या गवंड्याचे नाव आहे. खुनाची ही घटना रविवारी मध्यरात्रीनंतर पहाटे दरम्यान घडली आहे. राजेश काळे याला दारूचे व्यसन होते. त्याच दिवशी त्याचा पगार झाला होता. राजेश आणि त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून करणारे संशयित रात्रीपासून शहराच्या पश्चिम भागात एकत्रितपणे फिरत असल्याचे ठिकठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसून आले आहे.
घटना घडल्यापासून पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील दृश्ये आणि मोबाइलच्या कॉल डिटेल्सवरून तपासाला गती दिली होती. यातून निष्पन्न झालेल्या चौघांकडे कसून चौकशी सुरू आहे. मात्र पोलिसांना निश्चित हल्लेखोरांपर्यंत अद्याप पोहोचता आलेले नाही. राजेश काळे संदर्भात मिळत असलेल्या माहितीवरून संशयितांचा शोध घेण्याचे काम गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून सुरू आहे.