सांगली : ग्रामीण भागातील पाणीटंचाई आटोक्यात आणण्यासाठी जिल्ह्यातील रखडलेल्या पाणी योजना तातडीने पूर्ण करणे आवश्यक असून, केवळ आपल्या लाभासाठी पाणी पुरवठा योजनांची कामे थांबविणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रसंगी निलंबनाची कारवाई करावी, असे आदेश खासदार संजय पाटील यांनी सोमवारी दिले. जिल्हास्तरीय दक्षता व सनियंत्रण समितीच्या सभेत पाटील बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, आमदार शिवाजीराव नाईक, विलासराव जगताप, अनिल बाबर यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनांच्या आढाव्यावेळी शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांनी, तालुक्यातील पाणी पुरवठा योजनांची कामे ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या अधिकाऱ्यांकडून मुद्दामहून रखडली जात असल्याची तक्रार केली. या पाणी योजना रखडल्याने त्या भागातील पाणी पुरवठा यंत्रणा कोलमडल्याचा आरोप त्यांनी केला. यावर, केवळ स्वत:च्या फायद्यासाठी योजनांची कामे थांबविणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा, अशी सूचना त्यांनी दिली. रोजगार हमी योजनेच्या आढाव्यावेळी जत तालुक्यातील अपूर्ण विहिरींची कामे बंद पडली असल्याची बाब आमदार विलासराव जगताप यांनी निदर्शनास आणून दिली असता, अशा विहिरींची कामे पूर्ण करण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन योजनांची कामे रोहयोतून करण्याची सूचना आमदार अनिल बाबर, विलासराव जगताप यांनी केली. यावर जिल्ह्यातील म्हैसाळ, ताकारी, टेंभू, आरफळ आणि शिराळा तालुक्यातील वारणा कालव्यातील पोटकालवे व यंत्राशिवाय करता येण्यासारखी कामे करावीत, अशी सूचना खासदारांनी दिली. प्रादेशिक पाणी पुरवठा योजना थकबाकीमुळे बंद पडत असताना, त्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी न होता शेतीसाठी होत असून, पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले. आटपाडीला होणारा पाणी पुरवठा अनियमित होत असून २० दिवसातून एकदा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे पाणी पुरवठा योजनेची थकबाकी भरणे शासनाचे काम नसून ग्रामपंचायतीकडून थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न करण्याची मागणी बाबर यांनी केली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर, जि. प.चे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील, सभापती गजानन कोठावळे, मिरज पंचायत समिती सभापती दिलीप बुरसे, कवठेमहांकाळ सभापती वैशाली पाटील, वैशाली माळी, चंद्रकांत पाटील, रवींद्र बर्डे, सुमन देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)आदेश,निर्णयरोहयोतून अपूर्ण विहिरींची कामे प्राधान्याने पूर्ण करा.सिंचन योजनांची कामे रोहयोतून करा.शौचालयांच्या कामांसाठी खासगी कंपन्यांचे साहाय्य घ्या.दुष्काळात धान्यवाटप सुरळीत होण्याकडे लक्ष द्या.इंदिरा आवास योजनेत लाभार्थींना संधी द्या.१०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेकडून होणाऱ्या फसवणुकीविरोधात कारवाई करा. सोनोग्राफी केंद्रांची नियमित तपासणी करून अहवाल सादर करा.
योजनांची कामे थांबविणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा
By admin | Published: October 19, 2015 11:07 PM