सांगली : स्थानिक संस्था कर (एलबीटी) हटवावा, एलबीटीच्या वसुलीसाठी व्यापाऱ्यांवर दाखल करण्यात आलेली फौजदारी मागे घ्यावी आदी मागण्यांसाठी एलबीटीविरोधी कृती समितीचे सोमवारपासून सुरु असलेले बेमुदत उपोषण आज (मंगळवार) स्थगित करण्यात आले. यापुढे व्यापाऱ्यांवर फौजदारी केली जाणार नाही, एलबीटी हटविण्यासाठी भाजप शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन भाजपने दिले. त्यानंतर सायंकाळी साडेसातच्या सुमारास व्यापाऱ्यांनी आंदोलन स्थगित केले. आंदोलनाचे नेतृत्व समीर शहा यांनी केले.बेमुदत उपोषणाला चार व्यापारी बसले होते. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज परभणी व कोल्हापूरचे व्यापारी सहभागी झाले होते. दरम्यान, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष शेखर इनामदार यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने आज दुपारी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र यामध्ये त्यांना यश आले नाही. त्यानंतर माजी आ. दिनकर पाटील, शेखर इनामदार, श्रीकांत शिंदे, प्रकाश बिरजे आदींनी पुन्हा सायंकाळी सातच्या सुमारास आंदोलन करणाऱ्या व्यापाऱ्यांची भेट घेतली. खा. संजय पाटील, आ. सुधीर गाडगीळ यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन एलबीटी हटविण्यासाठी चर्चा केली. हा कर लवकरात लवकर हटविण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले. त्याचबरोेबर फौजदारी रोखण्यासाठीही पावले उचलण्याचे आश्वासन त्यांनी दिले. ही माहिती भाजपच्या शिष्टमंडळाने आंदोलनकर्त्यांना दिले व आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. त्यानुसार व्यापाऱ्यांनी भाजप नेत्यांच्याहस्ते सरबत घेऊन आंदोलन स्थगित केले. महापालिकेने एलबीटी वसुलीसाठी ३० हून अधिक व्यापाऱ्यांवर न्यायालयात फौजदारी दाखल केली आहे. तसेच व्यापाऱ्यांचे दफ्तर तपासणीच्या हालचाली सुरू आहेत. याच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांचे उपोषण होते. विराज कोकणे, समीर शहा, अनंत चिमड, सुरेश पाटील हे बेमुदत उपोषणास बसले होते. त्यांना पाठिंबा देण्यासाठी परभणीचे आनंद बाळके, नरेश खैराजानी, अतुल शेळके, विक्रम रामसिंघानी व कोल्हापूरचे सदानंद कोरगावकर, संजय रामसिंघानी, संजीव शहा यांंनी आंदोलनात सहभाग घेतला. (प्रतिनिधी)मुख्यमंत्र्यांनी, एलबीटी हटविण्यासाठी लवकरच पावले उचलली जातील, त्याचबरोबर वसुलीसाठी फौजदारी न करण्याचे आदेश आयुक्तांना दिले जातील, असे आश्वासन दिले आहे. त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही आंदोलन मागे घेत आहोत. यापुढे व्यापाऱ्यांवर फौजदारी केल्यास पुन्हा आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा विराज कोकणे, समीर शहा आदी व्यापाऱ्यांनी दिला. आयुक्तांनी कारवाई थांबवावी व केलेली कारवाई मागे घ्यावी, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली.
व्यापाऱ्यांचे आंदोलन स्थगित
By admin | Published: December 16, 2014 10:44 PM