सांगली : कवठेमहांकाळ पंचायत समितीकडे नियुक्ती होऊनही वर्षभरात हजर न झाल्याचा ठपका ठेवून गटविकास अधिकारी म्हणून श्रीमती एस. एन. बिडवे यांना शुक्रवारी निलंबित करण्यात आले. त्यांची विभागीय चौकशीही करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. श्रीमती एस. एन. बिडवे पुणे येथील यशदा शासकीय प्रशिक्षण संस्थेत प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. शासनाने दि. २८ मे २०१३ रोजी त्यांची जळगाव येथील पंचायत समितीकडे गटविकास अधिकारी म्हणून बदली केली होती, पण तेथे त्या रूजू झाल्या नाहीत. त्यामुळे त्यांची पुन्हा दि. २१ जून २०१४ रोजी दोडामार्ग (जि. सिंधुदुर्ग) पंचायत समितीकडे गटविकास अधिकारी म्हणून नेमणूक केली. तेथेही त्या रूजू झाल्या नाहीत. पुन्हा शासनाने दि. १७ जानेवारी २०१५ रोजी आदेश काढून तातडीने दोडामार्ग येथे रूजू न झाल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र त्या तेथेही रूजू झाल्या नाहीत. त्यानंतर शासनाने कवठेमहांकाळ पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी पदावर दि. ३० नोव्हेंबर २०१५ रोजी त्यांची नियुक्ती केली. येथेही त्या रूजू झाल्या नाहीत. यामुळे श्रीमती एस. एन. बिडवे यांनी शासन आदेशाचा अवमान केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. निलंबित कालावधित त्यांचे मुख्यालय सांगली जिल्हा परिषद असणार असून, शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही. त्यांची विभागीय चौकशीही करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
कवठेमहांकाळच्या बीडीओ बिडवे निलंबित
By admin | Published: September 23, 2016 11:41 PM