सांगली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील जत आणि आटपाडी तालुक्यातील कामांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल विशेष तांत्रिक अधिकारी जितेंद्र सांगलीकर व रामपूर (ता. जत) येथील वृक्ष लागवडीमधील खर्चामध्ये मोठा गैरव्यवहारप्रकरणी ग्रामसेविका स्वाती मस्के यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील यांनी दिली.ते पुढे म्हणाले, रोजगार हमी योजनेचे काम दर्जेदार आणि गतीने होण्यासाठी कृषी अधिकारी जितेंद्र सांगलीकर यांची जत आणि आटपाडी तालुक्यासाठी विशेष तांत्रिक अधिकारी म्हणून दि. १ जानेवारी २०१६ रोजी नियुक्ती केली होती. प्रत्यक्षात सांगलीकर या दोन्ही तालुक्यात उपस्थितच राहिले नाहीत. त्यांच्याविरोधातील तक्रारींची दोन अधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली आहे. यामध्ये सांगलीकर यांच्यावर ठपका ठेवला असल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे. रामपूर येथे ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात वृक्ष लागवड केली आहे. तेथे प्रमाणापेक्षा जादा मजूर दाखविण्यात आले. शासनाच्या नियमानुसार ८० टक्के वृक्ष जगले पाहिजेत. पण रामपूर येथे मी स्वत: भेट दिली, त्यावेळी ६० टक्केही वृक्ष जगले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आर्थिक गैरव्यवहारही दिसत असल्यामुळे तेथील ग्रामसेविका स्वाती मस्के यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे, असेही पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
कृषी अधिकाऱ्यांसह ग्रामसेविकांचे निलंबन
By admin | Published: April 12, 2016 10:12 PM