जत : जत शहरातील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा नंबर दोन येथील प्रभारी मुख्याध्यापक शिवाजी विठ्ठल जाधव यांच्यावर बेशिस्त वर्तन केल्याचा आरोप ठेवून त्यांना निलंबित करण्याचा आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी काढला आहे. जाधव यांना यापुढे आटपाडी येथे हजर होण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका संगीता कांबळे यांनी जाधव यांच्याविरोधात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. जाधव हे अपमानास्पद वागणूक देऊन, कांबळे या दिव्यांग असल्यामुळे सतत दिव्यांगावरून शिवीगाळ करतात. यासंदर्भात एक वर्षापूर्वी त्यांच्याविरोधात तक्रार करूनही वरिष्ठांकडून त्याची दखल घेण्यात आली नाही. वरिष्ठ अधिकारी त्यांना पाठीशी घालत आहेत. यासंदर्भात एक वर्षापूर्वी मी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती, त्याची चौकशी झाली आहे. परंतु कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे शिवाजी जाधव हे त्रास देत आहेत. त्यामुळे जाधव यांच्याविरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संगीता कांबळे यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन पाठवून केली होती.
या पार्श्वभूमीवर केंद्रप्रमुख जयवंत वळवी यांनी जाधव यांच्या निलंबनाचा आदेश शुक्रवारी बजावला आहे. प्रभारी मुख्याध्यापक पदाचा कार्यभार जैनुद्दीन काशीम नदाफ यांच्याकडे देण्यात आला आहे.