सांगली : तासगाव येथील सुकमणी मल्टिकेअर प्रायव्हेट लिमिटेड या शक्तिवर्धक औषध कंपनीवर अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकला. भेसळीच्या संशयावरून संजीवनी एन्झायम, डायमंड कॅप्सूल कीट, एसटीपीएल ग्रोन हे प्रोटीन कॉन्सन्ट्रेट आदींचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. सुमारे ७ लाख ९७ हजार ९१० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त सुकुमार चौगुले यांनी दिली.तासगाव-गोटेवाडी रस्त्यावर राजेंद्र सोपान जाधव यांची सुकमणी मल्टिकेअर प्रा. लिमिटेड ही कंपनी आहे. याठिकाणी शक्तिवर्धक औषधे बनवली जातात. हा व्यवसाय अन्न परवाना न घेता चालू केला असल्याचे निर्दशनास आले आहे. त्यानुसार छापा टाकण्यात आला असून त्यांना व्यवसाय बंद करण्याबाबत नोटीस देण्यात आली आहे.
उत्पादनाच्या लेबलवर काही चुकीचा मजकूर छापला असल्याची शक्यता असल्याने, सर्व साठा जप्त करुन विक्रीस बंदी घातली आहे. याचे नुमने तपासणीस पाठविले असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारवाई करण्यात येणार आहे. अन्न सुरक्षा अधिकारी डी. एच. कोळी, स्वामी व नमुना सहायक कवळे यांनी ही कारवाई केली.