अविनाश कोळी, सांगली/ विकास शहा, लोकमत न्यूज नेटवर्क, शिराळा: सागाव (ता. शिराळा) येथील व्हेल माशाच्या उल्टी तस्करीच्या गुन्ह्याच्या तपासकामी वनविभागाने दोन पथके तयार केले असून आरोपींच्या शोधासाठी राज्यातील इतर ठिकाणी शोध कार्य सुरू केले आहे. काही घरांची झाडाझडती घेतली आहे. हा तपास समुद्र किनाऱ्यापर्यंत पोहोचलेला आहे, अशी माहिती सहायक वनसंरक्षक डॉ. अजित साजणे यांनी दिली. यामागे आंतरराष्ट्रीय रॅकेटचा संशयही व्यक्त केला जात आहे.
उपवनसंरक्षक नीता कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली मानद वन्यजीव रक्षक अजित पाटील यांचे बरोबर वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी तपास करत आहेत. शुक्रवार दि. १५ रोजी दुपारी चारच्या दरम्यान घडली होती. पेट्रोल पंपावर बनावट ग्राहक बनून वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी गेले होते. यावेळी वनविभागाने कारवाई करून व्हेल माशाच्या उल्टीची तस्करी करणाऱ्या रोहन सर्जेराव पाटील (वय २९, रा. कोनवडे, ता. भुदरगड जि. कोल्हापूर), प्रथमेश सुरेश मोरे (वय २३, वर्षे रा. सोळंबी, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर), दिग्विजय उत्तम पाटील (वय २४ रा. सागाव, ता. शिराळा), लक्ष्मण सुखदेव सावळे (वय ३४, रा. लातूर, सध्या रा. कळंबोली मुंबई), दत्तात्रय आनंदराव पाटील (वय ४१, रा. बिऊर, ता. शिराळा) यांना अटक केली होती.