मिरजेतील अॅपेक्स रुग्णालयात ८७ रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी रुग्णालय चालक डाॅ. महेश जाधव याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी डाॅ. महेश जाधव, त्याचा भाऊ डॉ. मदन जाधव याच्यासह १० जणांना अटक केली. या प्रकरणाचा सूत्रधार डॉ. महेश जाधव याची पोलीस कोठडी संपल्याने बुधवारी त्यास मिरज न्यायालयात हजर करण्यात आले. ॲपेक्स रुग्णालयातून रेमडेसिविर इंजेक्शनची काळ्याबाजारात विक्री केल्याची माहिती मिळाल्याने या प्रकरणाच्या चाैकशीसाठी डाॅ. जाधव याची पोलीस कोठडी वाढविण्याची मागणी पोलिसांनी न्यायालयात केली. मात्र न्यायालयाने डाॅ. जाधव यास न्यायालयीन कोठडी दिली. अॅपेक्समधून रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजारही केल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चाैकशी सुरू केली आहे. कोविड रुग्णांच्या मृत्यूसोबत रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळ्याबाजाराची चाैकशी सुरू केल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. अॅपेक्समध्ये कमिशनवर रुग्ण आणून गैरप्रकारात सहभागी झाल्याबद्दल अटक केलेल्या तीन रुग्णवाहिका चालकांना न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी दिली आहे.
अॅपेक्समध्ये रेमडेसिविरच्या काळ्याबाजाराचा संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2021 4:20 AM