सावळी येथे शुक्रवारी २९ साळुंख्या व ३ पारवे या पक्ष्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. अचानक मृत झालेल्या साळुंख्या नष्ट करून, बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर मृत पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी पुणे प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. सावळीत साळुंख्याचा व पारव्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तेथे भेट देऊन पाहणी केली. जत तालुक्यातील आवंडी येथेही २ मोरांचा मृत्यू झाला आहे. प्रयोगशाळा तपासणीत मृत पक्ष्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यास सावळी परिसरातील पोल्ट्रीमधील कोंबड्यांचीही तपासणी करण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी सांगितले.
मात्र जिल्ह्यात बर्ड फ्लूचा धोका नसल्याने लोकांनी घाबरू नये, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डाॅ. संजय धकाते यांनी केले आहे.
चाैकट
सावळीत अलर्ट झोन घोषित
सांगली : राज्यात काही ठिकाणी बर्ड फ्लू आजाराने कोंबड्या व इतर पक्षी दगावल्याचे आढळून आले आहे. मिरज तालुक्यातील सावळी येथील वेस्टर्न प्रेसिकास्ट प्रा. लि. कंपनीच्या आवारात पक्षी मृत झाल्याचे आढळून आले आहे. या पक्ष्यांच्या मृत्यूच्या कारणाचे निष्कर्ष येणे अद्याप बाकी आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या असून, यामध्ये त्यांनी मृत पक्षी आढळून आलेल्या ठिकाणास केंद्रबिंदू मानून १० किलाेमीटर त्रिज्येतील परिसरामध्ये कुक्कुट पक्ष्यांची, पक्षी खाद्यांची, अंडी खरेदी, विक्री,वाहतूक, बाजार व जत्रा, प्रदर्शन आयोजित करण्यास प्रतिबंध घातला आहे. तसेच सावळी हे गाव अलर्ट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे.
फाेटाे : १५ मिरज ३
ओळ : सावळी (ता. मिरज) येथे अचानक मृत झालेल्या पक्ष्यांचे नमुने पशुसंवर्धन विभागाने ताब्यात घेतले.