फोटो- ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथील शिवाजी पाटील यांच्या शेतात तालुका कृषी अधिकारी भगवान माने यांच्यासह अधिकाऱ्यांनी उन्हाळी सोयाबीन पिकाची पाहणी केली.
कुरळप : शेतीमधून अधिक उत्पादनाबरोबरच जमिनीचे आरोग्य टिकले पाहिजे. सेंद्रिय शेती संकल्पना पर्यावरण बाबीशी निगडित आहे. म्हणून रासायनिक शेतीपेक्षा सेंद्रिय शेती शाश्वत व कायमस्वरूपी उत्पन्न मिळवून देणारी असल्याचे मत तालुका कृषी अधिकारी भगवानराव माने यांनी व्यक्त केले. वाळवा तालुक्यातील विविध गावांतील शेतकऱ्यांनी कसबे डिग्रज शेती संशोधन केंद्रांतर्गत उन्हाळी सोयाबीन पिकाची लागवड केली आहे. ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथे या पिकाच्या पाहणी दाैऱ्यावेळी ते बोलत होते.
भगवानराव माने म्हणाले, शेती व्यवसायातून हव्यासापोटी ज्यादा उत्पादन मिळविण्यासाठी रासायनिक खतांचा अवाजवी व असंतुलित वापर, जमीन सतत पिकाखाली राहणे, सेंद्रिय खतांचा अभाव अशा विविध कारणांमुळे जमिनीचे आरोग्य दिवसेंदिवस बिघडत आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीचा मुद्दा जमिनीच्या सुपीकतेवर अवलंबून आहे. सेंद्रिय खतांच्या वापरामुळे जमिनीच्या भौतिक व रासायनिक आणि जैविक गुणधर्मावरून टिकून पर्यावरणाचा समतोल राखता येईल.
यावेळी विवेक ननवरे, सागर पाटील, कृषी सहायक राहुल देशमुख उपस्थित होते.