तासगाव : तासगाव व नागेवाडी या दोन्ही साखर कारखान्यांच्या थकीत बिलासाठी शुक्रवारी खासदार संजयकाका पाटील यांच्या घराकडे निघालेला मोर्चा चिंचणी नाका येथे पोलिसांनी अडविला. यावेळी पोलीस व शेतकरी यांच्यात झटापट झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. संतप्त शेतकऱ्यांनी सांगली-विटा मार्गावर ठिय्या मारत रास्ता रोको केला. यावेळी खासदार संजयकाका पाटील यांनी आंदोलनस्थळी येत, २ फेब्रुवारी रोजी बिले देण्याचे मान्य केले. यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेत, तहसील कार्यालयाच्या आवारात ठिय्या मारला.
यावेळी महेश खराडे म्हणाले, तासगाव आणि नागेवाडी कारखान्याच्या थकीत बिलासाठी ‘स्वाभिमानी’ने अनेकदा आंदोलने केली आहेत. आंदोलनातून बऱ्याच शेतकऱ्यांची ऊसबिले मिळविण्यात यश आले. अद्यापही शेतकऱ्यांची ३३ कोटी रुपयांची ऊसबिले थकीत आहेत. ही बिले मिळावीत, यासाठी २३ डिसेंबर रोजी तासगाव तहसील कार्यालयावर मोर्चा काढला हाेता. मोर्चाच्या वेळी तहसीलदार रवींद्र रांजणे व पोलीस निरीक्षकांंनी मध्यस्थी केल्यानंतर १५ जानेवारीचे धनादेश देण्यात आले. हे धनादेश अद्याप वटले नाहीत.
शुक्रवारी साडेबारा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली. आंदाेलक खासदार संजय पाटील यांच्या चिंचणी येथील बंगल्याकडे जाऊन ठिय्या आंदोलन करणार होते. शेतकरी जमावाने चिंचणीकडे जात असताना मोर्चा चिंचणी नका येथे मोर्चा अडविण्यात आला. यावेळी पोलीस व शेतकरी यांच्यात झटापट झाली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. संतप्त शेतकऱ्यांनी सांगली-विटा मार्गावर रास्ता रोको केला.
थकीत बिले २ फेब्रुवारीस देणार : संजय पाटील
चिंचणी नाक्यावर पोलिसांनी आंदोलकांना रोखल्यानंतर प्रचंड घोषणाबाजी सुरू झाली. वातावरण चिघळण्याची चिन्हे दिसत असतानाच, खासदार संजय पाटील यांनी घटनास्थळी येत आंदाेलकांची भेट घेतली. बँक कर्ज प्रकरण न झाल्याने मी बिले देऊ शकलो नाही. मात्र, २ फेब्रुवारी रोजी मी साऱ्या शेतकऱ्यांची बिले देणार आहे, असा शब्द त्यांनी दिला. यानंतर, शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेत, तहसील कार्यालयाच्या आवारात ठिय्या मारला.