ते म्हणाले की, नागेवाडी येथील साखर कारखान्याची मागील काही वर्षांची ऊस बिलं थकीत आहेत. यावर्षी कारखाना सुरू होण्यापूर्वी कारखान्याचे मालक खा. संजयकाका पाटील यांनी यंदा सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन २ हजार ७५० रुपये प्रमाणे बिल देऊ. ऊस बिल देण्यास विलंब करणार नाही, अशी ग्वाही देत ऊस पाठविण्याचे शेतकऱ्यांना आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देऊन शेतकऱ्यांनी ऊस पाठविला; मात्र जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात गाळप झालेल्या उसाचे अद्याप एक रुपयाही बिल शेतकऱ्यांना दिलेले नाही. ऊस गाळप झाल्यानंतर १४ दिवसांत ऊस बिल देणे कायद्याने बंधनकारक आहे; मात्र दोन ते तीन महिने झाले तरी अद्याप ऊस बिल मिळालेले नाही. त्यामुळेच नागेवाडी साखर कारखान्यासमोर शुक्रवारी तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. तरी या आंदोलनास शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महेश खराडे यांनी केले.
यावेळी राजेंद्र माने, सचिन महाडिक, गोरख महाडिक, नारायण वाघमोडे, तानाजी धनवडे, अख्तर संदे, विनायक पवार उपस्थित होते.