अशोक पाटील ।इस्लामपूर : वर्षभरापूर्वी इस्लामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत निर्माण झालेल्या विकास आघाडीतून स्वाभिमानी शेतकरी संघटना हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. त्यासाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून खासदार राजू शेट्टी यांना शह देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.खासदार शेट्टी, खोत, भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक, नानासाहेब महाडिक गट आणि हुतात्मा गट यांनी विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र येऊन राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांच्या पालिकेतील एकतीस वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावला. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. शेट्टी-खोत यांच्यात वितुष्ट आल्याने खोत यांनी विकास आघाडीतून खा. शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला बाजूला केले आहे. याचा प्रत्यय २९ रोजी होणाºया विकास आघाडीच्या कृतज्ञता सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेतून आला आहे. या पत्रिकेत खासदार शेट्टी यांचे नाव घालण्यात आलेले नाही.
इस्लामपूर पालिकेत विकास आघाडीला सत्तेवर येऊन एक वर्ष झाले. मात्र पालिका सभागृहात राष्ट्रवादीचे संख्याबळ जादा आहे. त्यामुळे विकास कामांना आणि ठराव करताना अडचणी येत आहेत. तरीही आगामी काळात होणाºया विकासाचा पाढा सत्ताधारी वाचत आहेत. अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे नियोजन सत्ताधाºयांना जमलेले नाही. असे असतानाही आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीविरोधात पुन्हा एकदा सर्व विरोधकांना एकत्र करण्याचे नियोजन कृतज्ञता सोहळ्याच्या निमित्ताने केले आहे.खोत यांनी स्वत:ची रयत क्रांती संघटनेची स्थापना केल्यापासून त्यांनी शेट्टी यांच्यावर कुरघोड्या करण्यास सुरुवात केली आहे. येथे होणाºया विकास आघाडीच्या कृतज्ञता सोहळ्यातील निमंत्रण पत्रिकेतून शेट्टी यांना वगळण्यात आले आहे. यावरूनच विकास आघाडीतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला हद्दपार केल्याचे बोलले जात आहे.
पालिकेत विकास आघाडीला खोत यांच्यारूपाने ताकद मिळाली आहे. त्यांच्या माध्यमातून शहराला मोठ्या प्रमाणात निधी मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. परंतु अद्यापही भरीव निधी मिळालेला नाही. २९ रोजी होणाºया कृतज्ञता सोहळ्यात तरी शहराच्या विकासासाठी काही ठोस उपाययोजना होणार का, याकडेही सर्व शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.