सांगली : एकरकमी ‘एफआरपी’च्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वसंतदादा साखर कारखान्याच्या दत्त इंडिया कंपनीच्या कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढून प्रशासनाचा निषेध केला. येत्या दोन दिवसात एकरकमी उसाचे बिल मिळाले नाही, तर कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष महावीर पाटील, माजी पंचायत समिती सदस्य संदीप राजोबा, संजय बेले, भागवत जाधव, जयकुमार कोले यांच्या नेतृत्वाखाली दत्त इंडिया कारखान्यावर मोर्चा काढला होता. कारखाना व्यवस्थापनासह केंद्र आणि राज्य शासनाच्या धोरणाविरोधात घोषणाबाजी केली जात होती. ‘उसाला एकरकमी एफआरपी मिळालीच पाहिजे’, ‘कोण म्हणतोय देत न्हाय, घेतल्याशिवाय राहत न्हाय’, ‘एकच गट्टी, राजू शेट्टी’ या घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला. मोर्चाला मुख्य गेटपासून प्रारंभ झाला. कार्यकर्ते घोषणा देत मुख्य कार्यालयाजवळ आले. त्याठिकाणी दत्त इंडिया कारखान्याचे उपाध्यक्ष मृत्युंजय शिंदे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी महेश खराडे म्हणाले, अडीच महिने उलटले तरी अद्याप एकरकमी एफआरपी दिलेली नाही. यामुळे शेतकरी अडचणीत आहे. बँकांची व सोसायट्यांची कर्जे थकली आहेत. बी-बियाणे, खते यासाठी शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे एकरकमी एफआरपी मिळालीच पाहिजे. त्यासाठीच आमचा संघर्ष सुरू आहे. एफआरपीचे तुकडे करण्याचे षड्यंत्र सुरू आहे. काही साखर कारखानदार एकरकमी एफआरपी द्यायच्या तयारीत आहेत. मात्र त्यांच्यावर भाजप सरकार दबाव आणत आहे. त्यामुळेच कारखानदार एकरकमी एफआरपी देण्यास टाळाटाळ करत आहेत. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपला याची किंमत मोजावी लागेल. एकरकमी एफआरपी न दिल्यास कारखान्यांना टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.यावेळी संजय खोलकुंबे, भरत चौगुले, शीतल मतीवडे, सतीश पाटील, पिरगोंडा पाटील, गोमटेश पाटील, नीलेश लोंढे, भैया पाटील, उमेश मुळे, पिंटू पाटील, शामराव सटाले, महेश संकपाळ, दादासाहेब पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
ऊस दराची आंदोलने फसवी : खोतकामेरी : निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ऊस दराबाबत केली जाणारी आंदोलने फसवी आहेत. याचे उत्तर मतदार त्यांना निवडणुकीत देतील, असे प्रतिपादन कृषी व पणनमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले. कामेरी (ता. वाळवा) येथे विविध विकास कामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा बँकेचे संचालक सी. बी. पाटील अध्यक्षस्थानी होते. मंत्री खोत म्हणाले, शेतकऱ्यांची पिळवणूक करणाºया प्रस्थापित कारखानदार राजकारण्यांच्या सायकलवर डबलसीट बसणाºयांना ऊस दराबाबत आंदोलन करण्याचा अधिकार आहे का? कामेरीच्या अंतर्गत पाईपलाईनसाठी ३ कोटी ९८ लाख रुपयांचा निधी दिला असून लवकरच त्याचे काम सुरु होईल. यावेळी जि. प. सदस्या सुरेखा जाधव, जगन्नाथ माळी, दि. बा. पाटील, दिलीप जाधव, शशिकांत पाटील, गुंडा माळी, जयदीप पाटील, अतुल पाटील, शिवाजीराव माने, ग्रा.पं. सदस्य विनायक पाटील उपस्थित होते. जयराज पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सुभाष पाटील यांनी आभार मानले.
बहे येथील शेतकऱ्यांनी केली ऊस बिलांची होळीशिरटे : बहे (ता. वाळवा) येथे साखर कारखान्यांनी चालू गळीत हंगामातील ऊस बिलाचे तुकडे केल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे साखर कारखानदार व शासनाविरोधात निषेध फेरी काढली. तसेच ग्रामपंचायत कार्यालयासमोर सरकारच्याविरोधात घोषणाबाजी करीत ऊस बिलांची होळी केली.परिसरातील साखर कारखान्यांनी चालू गळीत हंगामातील नोव्हेंबरअखेर तुटलेल्या उसाचे बिल नुकतेच बँकेत जमा केले आहे. हे बिल एफआरपीनुसार दिले नसल्याने शेतकºयांनी शासन व कारखानदारांच्या निषेधार्थ
घोषणाबाजी करीत गावातून निषेध फेरी काढली.ग्रामपंचायत कार्यालयासमोर शासनाच्या धोरणाचा निषेध करीत उपस्थित शेतकºयांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. निषेध फेरीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शहाजी पाटील, तालुका उपाध्यक्ष सुरेश पाटील, विलास पाटील, प्रवीण पाटील, प्रताप थोरात, मधुकर बावचकर, दशरथ यादव, प्रकाश पाटील, आर. पी. पाटील, शामराव जगताप, हुसेन शेख आदी सहभागी झाले होते.
वसगडेत तीन कारखान्यांच्या कार्यालयास कुलपेभिलवडी : उसाला एकरकमी एफआरपी मिळावी, या मागणीसाठी सोमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वसगडे (ता. पलूस) येथील तीन साखर कारखान्यांच्या कार्यालयांना टाळे ठोकून कामकाज बंद पाडले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते संदीप राजोबा यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यात अजित पाटील, अमोल पवार, धन्यकुमार पाटील, पप्पू पाटील आदी कार्यकर्ते सहभागी झाले. क्रांती साखर कारखाना कुंडल, उदगिरी शुगर व दत्त इंडिया या तीन कारखान्यांच्या कार्यालयास टाळे ठोकले. यावेळी कार्यालयातील सर्व कामगारांना बाहेर काढून कामकाज बंद पाडले.