सांगली : राज्य सरकारची कर्जमाफी तकलादू आहे. संपूर्ण कर्जमाफीसह सात-बारा कोरा, या मागणीवर आम्ही ठाम आहोत. यासह विविध मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी (दि. ८) देशव्यापी संप पुकारला आहे. त्यामध्ये संघटनेच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भारत शंभर टक्के बंद राहील, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली. सांगलीत शुक्रवारी संघटनेचा मेळावा झाला, त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यावेळी उपस्थित होते.
शेट्टी म्हणाले, देशातील २६५ संघटनांच्या किसान संघटना समन्वय समितीने ८ जानेवारीच्या संपात सहभाग जाहीर केला आहे. यात केंद्राच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध केला जाईल. संपूर्ण ग्रामीण भारत बंदसाठी शेतकरी संघटनांचा पुढाकार राहील. काही ठिकाणी रास्ता रोकोही होईल. उसाला एफआरपी अधिक दोनशे रुपये या मागणीवर आम्ही ठाम आहोत. कारखाने उसाअभावी अडचणीत असल्याने आंदोलनाची दिशा बदलली आहे. आंदोलनामुळे गाळप हंगामात अडथळे येऊन शेतकऱ्यांचेच नुकसान झाले असते. महापुरातील ऊस तोडला नाही, तर कारखान्यांना सोडणार नाही. दोनशे रुपये अधिक न देणाºया कारखान्यांची वाहतूक शेतकऱ्यांनी रोखावी.
विशाल पाटील म्हणाले, सरकारची कर्जमाफी फसवी आहे. जिल्हा बँकेत आम्हाला शेतकºयांचे दररोज फोन येत आहेत. सरसकट कर्जमाफी न दिल्यास लढा उभारावा लागेल. यावेळी जिल्हाध्यक्ष पोपट मोरे, महेश खराडे, संजय बेले, संदीप राजोबा, भागवत जाधव, बी. आर. पाटील, प्रकाश सटाले, गुलाबराव यादव, महेश जगताप, जोतिराम जाधव, भरत चौगुले, राजेंद्र माने, शंकर लंगोटे आदी उपस्थित होते.
- धरसोडीने : तीनशे शेतकऱ्यांची आत्महत्या
शेट्टी म्हणाले, निवडणुकीवेळी सात-बारा कोरा करण्याचे आश्वासन सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी दिले होते. पण धरसोडीने तीनशे शेतकºयांनी आत्महत्या केल्या. थकीत किंवा चालू कर्जमाफीने दिलासा मिळाला असता, तर आत्महत्या झाल्या नसत्या. कर्जमाफीचा फायदा बड्या कारखानदारांना होईल म्हणणे म्हणजे शेतकºयांच्या बदनामीचा प्रयत्न आहे. दोन लाखांची मर्यादा ठेवल्याने तसा फायदा होणार नाही.
- वाटण्या बाजूला ठेवून कामाला लागा
शेट्टी म्हणाले, सरकार सत्तेत येऊन महिना लोटला तरी खातेवाटप नाही. सरकारने वाटण्या बाजूला ठेवून कामाकडे लक्ष द्यावे. मंत्रीपदावर कोण आहे यापेक्षा शेतकºयाला न्याय कोण देतो, याला स्वाभिमानीचे महत्त्व राहील.