सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी संधी दिल्यास सांगलीलोकसभा निवडणूक लढविणार आहे, अशी माहिती स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली. लोकसभा निवडणूक स्वाभिमानीकडून ताकदीने लढविण्याचा निर्धार केला आहे. ही निवडणूक 'एक व्होट, एक नोट' या तत्त्वावर लढविण्याचे ठरविण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.सांगलीतील सर्किट हाउस येथे बुधवारी बैठक झाली. अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पोपट मोरे होते. बैठकीला कार्याध्यक्ष संदीप राजोबा, युवा आघाडीचे संजय बेले, भागवत जाधव, बाबा सांदरे, राजेंद्र पाटील, संजय खोळखुंबे, भरत चौगुले आदी उपस्थित होते.महेश खराडे म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानी कोणत्याही पक्षाबरोबर आघाडी करणार नाही. राजू शेट्टी यांनी राज्यात सहा लोकसभा लढविण्याची घोषणा केली आहे. सांगली लोकसभेचाही त्यामध्ये समावेश आहे. त्यामुळे सांगली लोकसभा ताकदीने निवडणूक लढविण्याचा निर्धार जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी केला आहे. आमच्याकडे पैसे नाहीत. मात्र आमच्या कार्यकर्त्यांकडे हत्तीचे बळ आहे. त्याच्या जोरावर 'एक व्होट, एक नोट' या तत्त्वावर ही निवडणूक लढविली जाईल.
मौनी खासदारांना घरचा रस्ता दाखवा : महेश खराडेकामाच्या जोरावर ही निवडणूक लढविण्यात येणार आहे. ऊस दर, दूध, द्राक्ष, कर्ज माफी, दिवसा वीज मिळावी, यासाठी केलेला संघर्ष घराघरापर्यंत पोहोचवून मतदारांमध्ये जागृती करणार आहे. संसदेत दहा वर्षांत शब्दही न काढणाऱ्या मौनी खासदारांना घराचा रस्ता दाखविण्याची वेळ आली आहे, अशी टीकाही महेश खराडे यांनी खासदार संजय पाटील यांचे नाव न घेता केली.