लोकमत न्यूज नेटवर्ककऱ्हाड : शेतकऱ्यांना शासनाकडून कर्जमुक्ती दिली जात नसल्याने त्यांच्यावर आत्महत्येची वेळ येत आहे. कर्जमुक्तीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे खासदार राजू शेट्टी यांनी ‘आत्मक्लेश’ यात्रा काढली आहे. मात्र, अद्यापपर्यंत सरकारचा एकही प्रतिनिधी आत्मक्लेश यात्रेत राजू शेट्टी यांना भेटायला गेलेला नाही. तसेच मुख्यमंत्र्यांकडूनही कर्जमुक्तीबाबत निर्णय घेतले जात नाही. याचा निषेध करीत मलकापूर येथे कृष्णा हॉस्पीटलसमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कऱ्हाड उत्तरचे तालुकाध्यक्ष सचिन नलवडे, प्रदीप मोहिते, योगेश झांबरे, आदींसह कार्यकर्त्यांचा समावेश होता.मलकापूर येथे सोमवारी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील येणार असल्याने त्यांचा निषेध करण्यासाठी स्वाभिमानीचे कार्यकर्ते अगोदरच तयारीत होते. त्यांनी विमानतळ व कृष्णा हॉस्पीटल येथे काळे झेंडे दाखविण्यासाठी फिल्डिंग लावली होती. दुपारी दीड वाजता मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा मलकापूर येथील कृष्णा हॉस्पीटल परिसरात आला असता यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांच्या ताफ्यासमोर येऊन काळे झेंडे दाखविले. यावेळी ‘भाजप सरकारचा निषेध असो, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळालीच पाहिजे. ‘आत्मक्लेश’ यात्रेची दखल न घेणाऱ्या सरकारचा धिक्कार’ अशा घोषणा देण्यात आल्या. या निदर्शनामुळे बंदोबस्तासाठी असलेले पोलिस व अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र, काही कळण्याच्या अगोदरच आंदोलकांनी आपला हेतू साध्य करून घेतला होता. पोलिस प्रमुखांनी बंदोबस्तासाठी असणाऱ्यांची चांगलीच हजेरी घेतली असल्याचे समजते.कार्यकर्त्यांचा गनिमीकावा यशस्वी !मलकापूर येथे भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सहकारमंत्री चंद्रकांत पाटील हे येणार असल्याने ठिकठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या गाड्यांचा ताफा मेळाव्याकडे निघाला असता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ‘गनिमी काव्या’ प्रमाणे काळे झेंडे दाखवित निषेध केला. कडक पोलिस बंदोबस्तातही कार्यकर्त्यांनी आपले निषेध आंदोलन यशस्वी करून दाखविले. दिवसभर या आंदोलनाचीच चर्चा होती.
‘स्वाभिमानी’ने मुख्यमंत्र्यांना दाखविले काळे झेंडे!
By admin | Published: May 29, 2017 11:09 PM