समडोळी : दोन दिवसांच्या आत एफआरपी द्या, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलनाचा भडका उडाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी साखर कारखानदारांना दिला आहे. गेल्यावर्षी तुटलेल्या उसाचा दुसरा हप्ता चारशे रुपये आणि पहिली उचल साडेतीन हजार रुपये देण्याचा मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारी इस्लामपूर रस्त्यावरील लक्ष्मी फाटा परिसरात चक्काजाम आंदोलन केले. आंदोलनास चांगला प्रतिसाद लाभला.
कोणत्याही परिस्थितीत मागील वर्षीचे पैसे घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. सगळे कारखानदार एक झाले आहेत. राज्यातील सरकार कारखान्यांना सामील झाले आहे. गेल्या वर्षी तुटलेल्या उसाला चारशे रुपये आणि चालू हंगामात साडेतीन हजार रुपये दर मिळावा यासाठी चक्काजाम आंदोलन करीत आहोत. आमच्या शेतातील ऊस सुरक्षित आहे, आमचे नुकसान नाही. उलट कारखानदारांचे नुकसान आहे. त्यामुळे कारखानदाराने तोंड उघडावे आणि भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. त्यासाठी रविवारी चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, युवा जिल्हाध्यक्ष संजय बेले, सचिव दीपक मगदूम, तालुकाध्यक्ष बाबासाहेब सांद्रे, समडोळी ग्रामपंचायत सदस्य दस्तगीर मुजावर, प्रवीण पाटील, दुधगावचे उपसरपंच प्रवीण कोले, सौरभ पाटील, भरत साजणे, सुनील फराटे, बंडू कागवाडे, अमित पाटील यांच्यासह समडोळी, कवठेपिरान, दुधगाव, सावळवाडी, माळवाडी येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.