सांगली : जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी कोल्हापूर पॅटर्नप्रमाणे दराची घोषणा करून ऊस दराची कोंडी फोडावी आणि त्यानंतरच गळीत हंगाम सुरू करावेत. या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी बुधवारी वसगडे (ता. पलूस) आणि नांद्रे (ता. मिरज) येथे दत्त इंडिया, राजारामबापू कारखान्याची ऊस घेऊन जाणारी वाहने रोखून धरली आहेत.कोल्हापूर पॅटर्नप्रमाणे ऊस दर देण्यास सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी नकार दिला आहे. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ऊस वाहतूक रोखण्याचे आंदोलन सुरू केले आहे. बुधवारी वसगडे, अंकलखोप, नांद्रे येथील ऊस तोडी रोखून वाहने रोखली आहेत. दिवसभरात शेकडो वाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रोखून धरली होती. तसेच अनेक ठिकाणच्या ऊस तोडीही बंद पाडण्याचा प्रयत्न केला.संदीप राजोबा म्हणाले, माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्ह्यात ऊस दराची कोंडी फोडली आहे. त्यानुसार तीन हजार रुपयांहून अधिक एफआरपी असणाऱ्या कारखान्यांनी प्रतिटन ५० रुपये आणि तीन हजार रुपयांपेक्षा कमी एफआरपी असणाऱ्या कारखान्यांनी प्रतिटन १०० रुपये द्यावेत, असा यशस्वी तोडगा काढला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी निर्णय मान्य करून गळीत हंगाम सुरू केले आहेत; पण सांगली जिल्ह्यातील कारखाने कोल्हापूर पॅटर्न मान्य करण्यास तयार नाहीत. या कारखान्यांनी ऊस दराची कोंडी फोडल्याशिवाय गळीत हंगाम सुरू करू नयेत, अन्यथा ऊस तोडी रोखणार आहे.
जिल्ह्यातील आंदोलनात विविध ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडीचे संजय बेले, पलूस तालुकाध्यक्ष बाळासो शिंदे, उपसरपंच उमेश पाटील, जयकुमार कोले, पलूस तालुका युवा आघाडीचे अध्यक्ष धन्यकुमार पाटील, कडेगाव तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव, संदीप चौगुले, संजय बुद्रुक, अमोल पाटील, रावसो खोत, सुशांत चौगुले, संतोष पाटील, संजय चौगुले, सतीश चौगुले आदी सहभागी होते.
कारखानदारांनी ११० कोटी शेतकऱ्यांचे लाटले : संदीप राजोबाजिल्ह्यातील साखर कारखान्यांनी कोल्हापूर पॅटर्नची अंमलबजावणी केली नाही. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे ११० कोटी रुपये लाटले आहेत, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी केला आहे. कारखानदारांकडून शेतकऱ्यांचे ११० कोटी रुपये मिळविण्यासाठी आंदोलनाचा लढा आमचा चालूच असणार आहे, असेही राजोबा म्हणाले.