वाई : परकीय गुलामगिरीतून रयतेला मुक्त करून हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ वयाच्या सोळाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना घेऊन ३७० वर्षांपूर्वी ‘रायरेश्वर’ किल्ल्यावर रायरेश्वराच्या मंदिरात घेतली. या ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार असलेल्या किल्ल्यावर पुरातन मंदिरांची झालेली दुरवस्था, गडावर जाण्यासाठी नसलेला रस्ता, ग्रामस्थ व पर्यटकांना होणारी पिण्याच्या पाण्याची टंचाई, शैक्षणिक व आरोग्याच्या असुविधा दूर करण्याचे मोठे आव्हान लोकप्रतिनिधी व शासनापुढे उभे आहे. या समस्या व अडचणी दूर झाल्यास शिवकालीन इतिहासाला उजाळा मिळून पर्यटकांची संख्या वाढेल व स्थानिकांना रोजगार मिळेल, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.गडावरील रायरेश्वर मंदिराजवळ सर्वोच्च माळ्याची टेकडी आहे. येथून निसर्गाचे विलोभनीय विहंगम दृश दिसते. उत्तरेला तुंग तिकोना लोहगड व विसापूर डोंगर दिसतात. तसेच प्रतापगड, केंजळगड, कमळगड, विचित्रगड व मकरंदगडही दिसतात. गडावर सात रंगाची माती आढळते. पश्चिमेला नाखिंदा कडा आहे. गडावर जननी देवीचे मंदिरही प्रसिद्ध आहे. रायरेश्वर गडावर जंगम घराण्याची ४५ घरे असून, सुमारे साडेपाचशे लोकवस्ती आहे. पावसाळ्यात चार महिने सूर्याचे दर्शन होत नाही. येथे पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणात होते. येथील नागरिकांची शेती व जनावरे उत्पन्नांची साधने असून, अतिपावसाने जनावरेही दगावतात. त्यामुळे मोठा आर्थिक फटका बसतो. केवळ थंड हवामानाने गव्हाचे उत्पन्न होते. जादा तर नागरिक युवक उदरनिर्वाहासाठी कामाधंद्यानिमित्त बाहेरगावी शहरात जातात. मुलांना समाज मंदिरात बसून शिक्षण घ्यावे लागते. गडावर जाण्या-येण्यासाठी रस्ता नसल्याने माध्यमिक शिक्षणासाठी चार-पाच तास पायपीट करत वाई किंवा भोर येथे जावे लागते. मंदिराजवळ गायमुखाचा झरा हाच पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत आहे. शासनाने शिडीचा कडा यापासून एक किलोमीटरचा रस्ता तयार केला तर किल्ल्यावर सहज जाता येईल त्यामुळे पर्यटकांची संख्या वाढून स्थानिकांना रोजगार मिळेल. (प्रतिनिधी)आजारी व्यक्तीवर उपचार करणेही अवघडपावसाळ्यात चार महिने सूर्यदर्शन होत नाही. मुसळधार पाऊस, वादळी वाटा त्यामुळे गडावरून खाली येता येत नाही. त्यामुळे चार महिने पुरेल एवढा अन्नधान्याचा साठा करावा लागतो. रस्ता नसल्याने एखादा आजारी पडल्यास त्याला उपचारासाठी नेताना खूप हाल होतात. ४शासनाने कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची योजना सुरू करावी, रायरेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करावा, गडावर जाण्यासाठी रस्ता करावा, पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात, अशा स्वरूपाच्या मागण्या स्थानिकांकडून होत आहेत.उन्हाळ्यात ग्रामस्थांना शिवकालीन झऱ्यातून पाणी आणावे लागते. यासाठी दोन किलोमीटर पायपीट करावी लागते. पर्यटकांचीही गैरसोय होते.गडावर जाण्यासाठी रस्ता नसल्याने अनेक पर्यटक, वृद्ध यांची इच्छा असूनही जाता येत नाही. रस्ता झाल्यास पर्यटकांची संख्या वाढेल व स्थानिकांना रोजगार मिळेल.
स्वराज्याच्या शपथेचा साक्षीदार ‘रायरेश्वर’ विजनवासात
By admin | Published: March 01, 2017 11:47 PM