संजय माने
टाकळी (जि. सांगली) : अवकाळी पाऊस, हवामानातील बदल यातून सावरलेला द्राक्ष उत्पादक शेतकरी आता कोरोना व्हायरसच्या संकटात सापडला आहे. द्राक्ष दरात घट होत असल्याने आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी हवालदिल झाला आहे.द्राक्षशेतीच्या यंदाच्या हंगामात अवकाळी पाऊस, हवामानातील बदल यामुळे द्राक्षशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ज्या शेतकऱ्यांनी उशिरा छटणी घेतली, ते आपल्या द्राक्षबागा अवकाळी पावसापासून वाचवू शकले. त्यामुळे त्यांच्या उत्पादनात वाढ झाली. महागड्या औषधांची फवारणी करून द्राक्षशेती वाचविण्याचा प्रयत्न केला. द्राक्ष उत्पादन सर्वत्र कमी झाल्याने, चांगला दर मिळेल अशी शेतकºयांना आशा होती. काही प्रमाणात दर वाढतही होते. मात्र गेल्या महिन्यापासून जगभर धुमाकूळ घातलेल्या कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे मोठ्या शहरातील बाजारपेठा बंद होत आहेत. चीन, युरोप, बांगलादेश, कोलकाता या देशांमध्ये होणारी द्राक्ष निर्यात पूर्णपणे बंद झाल्याने व्यापा-यांकडून द्राक्षे खरेदीकडे पाठ फिरवली जात आहे.
पंधरा दिवसांपूर्वी १७० ते १८० रुपये चार किलोच्या द्राक्षपेटीचा दर होता. मात्र तो आता १२० ते १४० पर्यंत आला आहे. हा दर द्राक्ष उत्पादकांना परवडत नसल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी बेदाणा बनवण्याकडे वळत आहे. आता महाराष्ट्र व कर्नाटकातील बाजारपेठाही बंद झाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी आणखीनच संकटात आले आहेत. चीनमधून आलेल्या कोरोना व्हायरसमुळे द्राक्षांचा गोडवाही संपणार की काय, असा प्रश्न शेतक-यांना पडला आहे.व्यापार ठप्पमिरज पूर्व भागातून दररोज १०० गाड्या द्राक्षे कर्नाटक, महाराष्ट्र, बेंगलोरसह इतर ठिकाणी पाठविण्यात येत होती. मात्र कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र बाजारपेठा बंद आहेत. केवळ २० ते २५ गाड्या गेल्या दोन दिवसांपासून पाठविण्यात येत आहते. मात्र त्याही आता बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे याचा परिणाम द्राक्ष खरेदीवर होणार असल्याचे द्राक्ष व्यापारी युवराज सावंत यांनी सांगितले.बेदाणा करणारकोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशभरातील बाजारपेठा बंद करण्यात येत आहेत. त्यामुळे द्राक्षांना मागणीही घटणार आहे. द्राक्ष खरेदीकडे व्यापाºयांनीही पाठ फिरवली आहे. पंधरा दिवसात द्राक्षांची बाजारपेठ पूर्ण ठप्प होणार आहे. त्यामुळे द्राक्षापासून बेदाणा करण्यावर भर दिला जाणार आहे, असे द्राक्ष उत्पादक शेतकरी विशाल पाटील यांनी सांगितले.