शरद जाधव सांगली : संपूर्ण देशभरात सांगलीचा बेदाणा व्यापारासाठी असलेला नावलौकिक अधिकच अधोरेखित होऊ लागला आहे. यंदा दिवाळीसाठी संपूर्ण देशभरातून सांगलीच्या बेदाण्याला मागणी कायम होती. समाधानकारक दर आणि दर्जेदार मालामुळे यंदा सरासरी २५ हजार टन बेदाण्याची देशभरात विक्री झाल्याने दिवाळीचा आनंद वाढविणारी उलाढाल झाली आहे. यंदा शेतकऱ्यांनाही समाधानकारक दर मिळाला असून, बेदाण्याला मागणीही चांगली होती.बेदाण्यासाठी संपूर्ण देशात सांगलीची बाजारपेठ अग्रेसर समजली जाते. त्यामुळे देशभरातील व्यापाऱ्यांकडून येथूनच मालाची खरेदी केली जाते. स्वच्छ व पारदर्शी व्यवहार, दर्जेदार माल आणि सुलभ वाहतूक व्यवस्थेमुळे सांगलीतील बेदाणा उलाढाल वाढत आहे. या पार्श्वभूमीवर यंदा दिवाळीसाठीही चांगली उलाढाल झाल्याचे चित्र आहे.
दसऱ्यापासून १५ नोव्हेंबरपर्यंत बेदाणे सौदे पूर्णपणे बंद असतात. व्यापाऱ्यांची व्यवहार पूर्ण करण्यासाठी बेदाणा व्यापारी संघटनेने राबविलेल्या ह्यझिरो पेमेंटह्णच्या अंमलबजावणीसाठी सौदे बंद ठेवण्यात येतात. हे सौदे बंद ठेवण्याअगोदर दिवाळीसाठीची चांगली उलाढाल झाली आहे.देशभरातील बाजारपेठांमध्ये हिरवा, पिवळा व काळ्या बेदाण्यास मागणी असते. यातील हिरव्या बेदाण्याच्या खरेदीस प्राधान्य दिले जाते. दसऱ्याच्या अगोदर झालेल्या बेदाणा सौद्यांमध्ये दिवाळीची खरेदी पूर्ण करण्यात आली होती. त्यानुसार सरासरी १८ ते २५ हजार टन बेदाण्याची विक्री झाल्याचा अंदाज आहे. संपूर्ण वर्षभरात सांगलीतून सरासरी १ लाख ८० हजार ते २ लाख टनापर्यंत बेदाण्याची विक्री होत असते.
यातील दिवाळीतच विक्रमी विक्री झाली आहे. त्यामुळेच यंदा संपूर्ण देशभरात दिवाळीसाठी करण्यात आलेल्या मिठाईमध्ये सांगलीच्या बेदाण्याची चव असणार आहे. सध्या अजूनही माल शिल्लक असल्याने नवीन सौद्यांवेळी त्याची विक्री होणार आहे. दसऱ्याअगोदरच झालेल्या सौद्यांमधून ही उलाढाल झाली आहे.