हिटलरची आत्मकथा वाचा म्हणून कोणाला सांगितले, तर ती कोण वाचणार नाही. परंतु, त्याचवेळी ‘श्यामची आई’ वाचताना त्याच्या डोळ्यात आपसूकपणे पाणी येईल. ही गोड शब्दातील ताकद आहे. माणसाची सुंदरता बघायची झाली, तर ती त्याच्या विचारात असते, असे पाटील म्हणाले.
सांगली : गोड बोलणे ही एक कला असून, ती प्रत्येकाला जमेलच असे अजिबात नाही. चांगले बोलणे व गोड बोलणे यात काहीजण पारंगत असतात. आदर्श व्यक्तिमत्त्वासाठी विचार केल्यास कोणाच्याही बाह्यरूपापेक्षा त्याचे सकारात्मक विचार व भाषेतील गोडवा अधिक महत्त्वाचा ठरतो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.
जिल्हाधिकारी म्हणाले, नेहमी गोडच बोलले पाहिजे, याचे मी कधीही समर्थन करणार नाही. मी स्वत: फार गोड बोलत नाही. पण मला कुठे गोड बोलायचे व कुठे तिखट याची जाणीव आहे. प्रशासन बघताना काहीवेळा तिखट बोलायलाच लागते. काही लोक गोड बोलण्यात खूपच पारंगत असतात. जगाच्या पाठीवर असणाऱ्या सहज प्रवृत्तीमध्ये चांगले बोलण्यामुळेच व्यक्तिमत्त्व बनत असते.
बहुतांशवेळा अशक्य कामही गोड बोलण्यामुळेच शक्य होत असते. चेहरा सुंदर नसतानाही अनेक चित्रपट कलाकार, व्यक्ती जनमानसावर अधिराज्य गाजवित असतात. त्यांची सुंदरता बाह्यसौंदर्यात नसते, तर विचारात, गोड बोलण्यात असते. तिखट बोलणे आणि शस्त्रात काहीही फरक नाही. जखमेचा घाव भरून येऊ शकतो; पण माणसाने शब्दाने केलेले वार खोलवर राहतात, दु:ख देतात. मला अनेकजण म्हणतात की, तुम्ही ८० टक्के गोड बोलता आणि २० टक्के तिखट बोलता. याबद्दल एक शेर आवर्जून मी त्यांना सांगतो. ‘मेरे बोलने का अंदाज थोडा तिखा है, लेकीन मैने ये अंदाज मिठी जबान वालोंसेही सिखा है’.
कौटुंबिक पातळीवर, सामाजिक पातळीवर आपली भाषा गोडच असायला हवी. कोणताही माणूस दोन गोष्टीमुळे ओळखला जातो. एक त्याची वाणी आणि दुसरे त्याचे कर्म. माणसाचे कर्म बºयाचदा महत्त्वाचे ठरते. जिल्हाधिकारी म्हणून काम करताना एखादी व्यक्ती खूप आत्मियतेने आपले म्हणणे मांडत असते, त्यावेळी त्यास कठोर बोलणे म्हणजे पाप आहे, असे मी समजतो. विविध देशांच्या धर्मग्रंथात गोड वाणीचे वर्णन करण्यात आले आहे. यशस्वी होण्यासाठी गोड शब्द, सकारात्मक प्रवृत्ती, चांगले विचार व समाजाप्रती चांगली भावना आवश्यक आहे, असे मी आवर्जून सांगतो. त्यातूनच आदर्श व्यक्तिमत्त्व घडत असते.