अशोक पाटील ल्ल इस्लामपूर ऐन दिवाळीत पालिक ा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. या धार्मिक सणाचे औचित्य साधून उमेदवारांनी आपल्या प्रभागातील घरोघरी जाऊन मिठाईरूपाने मतदारांची दारे पूजली आहेत. नगराध्यक्षपदासाठी १ आणि नगरसेवक पदासाठी २ अशी एकूण तीन मते देण्याची संधी प्रथमच मतदारांना मिळत आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी गटाकडून गांधीबाबांचे दर्शन निश्चित आहे. त्यामुळे शहरातील मतदारांचा भाव चांगलाच वधारणार आहे. गेल्या तीस वर्षांत सत्ताधारी राष्ट्रवादीने आर्थिक ताकद आणि आमदार जयंत पाटील यांच्या कृपेने पालिकेवर सत्ता अबाधित ठेवली आहे. गेल्या साडेचार वर्षांत राष्ट्रवादीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत, तर विरोधी गटातील नेत्यांच्यात पायपोस नव्हता. याचाच फायदा घेऊन पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांचा एककलमी कार्यक्रम सुरू होता. आर्थिक व बहुमताच्या जोरावर पालिकेतील सभागृहात विरोधक औषधालाही ठेवणार नसल्याचा विडा विजयभाऊ पाटील यांनी उचलला आहे. परंतु विरोधकांकडे ऐन दिवाळी आणि पालिकेच्या निवडणुकीचा मुहूर्त साधून साम, दाम, दंड या रूपाने निशिकांतदादांचे नेतृत्व आले. त्यामुळे मतांचा भाव चांगलाच वधारणार आहे. प्रभाग १, २ मध्ये राष्ट्रवादीकडे सक्षम उमेदवार आहेत. त्यामुळे विरोधकांना या प्रभागात ताकद लावावी लागणार आहे. प्रभाग ३ व ४ मध्ये ज्येष्ठ नेते बाबासाहेब सूर्यवंशी आणि आनंदराव पवार यांच्यासारखे उमेदवार असल्याने सत्ताधाऱ्यांची ताकद तोकडी पडणार असल्याची चर्चा आहे. प्रभाग ५ मध्ये भाजपचे विक्रमभाऊ पाटील हे राजकीय अनुभवी नेतृत्व आहेत. उर्वरित उमेदवार नवखे आहेत. या ठिकाणी अंदाज बांधणे कठीण आहे. प्रभाग ७ मध्ये पालिकेतील ज्येष्ठ आणि हुशार नेतृत्व असलेले राष्ट्रवादीचे उपनगराध्यक्ष संजय कोरे यांची उमेदवारी असल्याने याठिकाणी कोरे यांच्या रूपाने राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे. त्यांना या प्रभागात तारेवरची कसरत करावी लागणार आहे. प्रभाग ८ मध्ये माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांचे चिरंजीव विश्वनाथ डांगे आणि मुस्लिम समाजातील माजी नगरसेवक पिरअली पुणेकर यांच्या पत्नी जरिना पुणेकर या उमेदवार असल्याने या प्रभागात डांगे गटाची निवडणूक प्रतिष्ठेची मानली जाणार आहे. प्रभाग ९ मध्ये विरोधी गटातील माजी ज्येष्ठ नगरसेवक एल. एन. शहा आणि कॉँग्रेसचे माजी नगरसेवक वैभव पवार यापैकी कोण उमेदवार आहे, हेच कोडे विरोधकांना अजूनही उलगडले नाही. प्रभाग १० मध्ये माजी नगराध्यक्ष अॅड. सुधीर पिसे आणि माजी नगरसेवक शिवाजीराव पवार यांच्या मातोश्री सुशिला पवार हे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. यांच्याविरोधात शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार यांनी आपले उमेदवार उभे केले आहेत. राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे विरोधकांना मोठे आवाहन आहे. प्रभाग ११ मध्ये एन. ए. गु्रपच्या विद्यमान नगरसेविका मनीषा पाटील आणि डांगे गटाचे विद्यमान नगरसेवक चंद्रकांत पाटील हे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात विरोधी गटातून अजित पाटील हे नवखे उमेदवार असून, विरोधी गटाला येथे कंबर कसावी लागणार आहे. प्रभाग १२ मध्ये एन. ए ग्रुपचे विद्यमान नगरसेवक खंडेराव जाधव हे राष्ट्रवादीचे प्रमुख उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात महाडिक युवा शक्तीचे विकास आघाडीतून अमित ओसवाल यांनी आपली उमेदवारी निश्चित केल्याने या प्रभागात संघर्षमय लढत होणार आहे. प्रभाग १३ मध्येही ज्येष्ठ आणि माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्या प्रदीर्घ अनुभवापुढे तरुण विरोधी पक्षनेते विजय कुंभार कितपत टिकाव धरतात, याबाबत वेगवेगळे तर्क वितर्क लढविले जात आहेत. गत निवडणुकीत पराभूत झालेले शहाजी पाटील हे पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांच्या हुकमी असलेल्या प्रभाग १४ मधून आपले नशीब आजमावत आहेत. परंतु या प्रभागात माजी नगरसेवक विजय कोळेकर निवडणूक लढविणार होते. परंतु त्यांचा पत्ता कट केल्याने कोळेकर समर्थक नाराज आहेत. याचा फायदा चंद्रकांत तांदळे यांना कितपत मिळतो, हे निकालावरूनच स्पष्ट होईल. काट्याची लढत पालिकेतील पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील आणि राष्ट्रवादीतून बाहेर पडलेले प्रकाश शिक्षण संस्थेचे निशिकांतदादा पाटील यांच्यामध्ये काट्याची लढत आहे. या दोघांमधील मतांच्या आकडेवारीचे तर्कवितर्क लढविले जात आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांतील कार्यकर्त्यांनी यावर मोठ्या प्रमाणात पैजाही लावण्यास सुरुवात केली आहे. यामुळे नेमके कोणाचे पारडे जड आहे, याचा अंदाज बांधणे सध्या तरी कठीण आहे.
इस्लामपुरात मिठाईरूपाने लक्ष्मी दारात
By admin | Published: October 30, 2016 11:31 PM