अविनाश कोळीसांगली : अथांग समुद्राच्या लाटांना महापुरातील राक्षसी प्रवाहाला आव्हान देत झपाझप पाण्यातून अंतर कापण्याची किमया सांगलीच्या तरुणीने साधली आहे. तेरा राष्ट्रीय स्पर्धा गाजवून सांगलीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोचण्यासाठी तिने अखंड मेहनत घेतली आहे. जलतरणपटू म्हणून देशभरातील स्पर्धा गाजवून संसाराला लागल्यानंतरही हजारो मुलांना कौशल्य शिकवण्याचे काम तिने सुरू केले आहे.वैशाली विनायक मगदूम (पूर्वाश्रमीची वैशाली सतीश पाटील) यांचा जलतरणातील प्रवास थक्क करणारा तसेच नव्या पिढीसाठी व खेळात करिअर घडवू पाहणाऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे. कृष्णा नदीच्या काठावर वसलेल्या गावभागातील त्यांचा जन्म. लहानपणापासून कृष्णामाईच्या कुशीत जलतरणाचा आनंद घेत यातील कौशल्य त्यांनी आत्मसात केले.
सांगली ते नृसिंहवाडीपर्यंत ६४ किलोमीटरचे नदीतले अंतर त्या सहज पार करतात. जलतरणातील कौशल्य आत्मसात केल्यानंतर त्यांनी जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा गाजविण्यास सुरुवात केली. जाईल तेथे त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण जलतरणाची छाप पडत गेली. केंद्र सरकारने त्यांच्यातील या कौशल्याची दखल घेत शालेय शिक्षण घेत असताना त्यांना दत्तक घेतले होते. पाचवी ते दहावीपर्यंत त्यांना पाचगणीच्या संजीवन विद्यालयात सरकारच्या वतीने शिक्षण देण्यात आले. शैक्षणिक धडे घेत त्यांनी जलतरणात बक्षिसांची लयलूट केली. आजवर त्यांनी १३ राष्ट्रीय स्पर्धा खेळल्या असून पदके मिळवली. विद्यापीठस्तरावर चॅम्पियन ठरलेल्या वैशाली यांनी उत्कृष्ट जलतरणपटूचा किताब पटकावला.मुंबईच्या समुद्रात गेट वे ऑफ इंडियापासून सेन रुफपर्यंतचे अंतर त्यांनी विक्रमी वेळेत पार केले होते. महापुराच्या पाण्यात आयर्विन पुलावरून उड्या मारणाऱ्या पुरुषांच्या गर्दीत वैशाली यांची उडी व पोहण्याचे कसब लोकांना थक्क करून जाते.प्रशिक्षकाची जबाबदारीवैशाली मगदूम सध्या रोटरीच्या जलतरण केंद्रात प्रशिक्षक आहेत. तीन वर्षाच्या मुलांपासून ८० वर्षांच्या वृद्धांनाही त्यांनी पोहण्याची कला शिकवली. काेणत्याही वयात पोहता येते, याचा आत्मविश्वास त्यांनी अनेकांत जागवला. त्यांच्याकडे शिकलेली शेकडो मुले राष्ट्रीय स्पर्धा गाजवत आहेत.