सांगली : येथील नळभागातील मदीना दाऊद पखाली (वय ४०) या महिलेचा रविवारी ‘स्वाइन फ्लू’ने मृत्यू झाला. स्वाइनचा हा शहरातील पहिलाच बळी आहे. या प्रकारानंतर आरोग्य विभागाने खणभाग, नळभागात घरोघरी जाऊन सर्व्हे सुरु केला आहे.मदीना पखाली गेल्या पंधरा दिवसांपासून ताप व खोकल्याच्या त्रासामुळे आजारी होत्या. त्यांच्यावर औषधोपचार सुरू होते, पण प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यामुळे त्यांना आठवड्यापूर्वी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. तिथेही त्यांची प्रकृती खालावत गेली. त्यांना स्वाइन फ्लूची लागण झाली असावी, असा डॉक्टरांना संशय आला. त्यामुळे त्यांनी पखाली यांच्या रक्ताचे व थुंकीचे नमुने तपासणीस घेऊन प्रयोगशाळेत पाठविले होते. त्याचा अहवाल शनिवारी प्राप्तझाला.यामध्ये त्यांना स्वाइन फ्लूचीलागण झाल्याचे स्पष्ट झाले होते.त्यानंतर त्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. पखाली यांच्या पश्चात पती, मुलगा व दोन मुली असा परिवार आहे.४६ संशयितांवर उपचारसध्या जिल्ह्यात ‘स्वाइन फ्लू’च्या ४६ संशयित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यातील पाचजणांच्या रक्ताचे व थुंकीचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. यात त्यांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या रुग्णांवर सांगली, मिरजेतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अन्य संशयित रुग्णांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.