सांगली/ताकारी : ‘स्वाइन फ्लू’च्या संशयित महिलेसह दोन रुग्णांचा सोमवारी मृत्यू झाला. आक्काताई राजेंद्र खोत (वय ४०, रा. सलगरे, ता. मिरज) व आनंदराव गणपती कुरळे (४६, माळीनगर भाग, रेठरेहरणाक्ष, ता. वाळवा) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या रक्ततपासणीचे अहवाल दोन दिवसांत प्राप्त होतील. त्यानंतरच त्यांना स्वाइन फ्लूची लागण झाली होती की नाही हे स्पष्ट होईल, असे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान,नव्याने पाच संशयित रुग्ण दिवसभरात दाखल झाले आहेत. आक्काताई खोत व आनंदराव कुरळे पंधरवड्यापासून ताप, सर्दी, खोकला व घसादुखीने आजारी होते. त्यांनी खासगी रुग्णालयात औषधोपचार घेतले होते, पण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचा संशय उपचार करणाऱ्या डॉक्टरांना आला होता. त्यामुळे आक्काताई यांना रविवारी दुपारी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविले होते. मात्र, तपासणी अहवाल येण्यापूर्वीच व उपचार सुरू असताना मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला. कुरळे यांना इस्लामपुरातील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. सोमवारी दुपारी तीन वाजता त्यांचाही मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली असा परिवार आहे. त्यांच्याच घराशेजारील एका महिलेस स्वाइन फ्लूची लागण झाली आहे. तिच्यावर कऱ्हाड (जि. सातारा) येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भवानीनगर (ता. वाळवा) येथील पार्वती मोहिते या महिलेचा काही दिवसांपूर्वी स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे. या परिसरातील बिचूद, रेठरेहरणाक्ष, ताकारी, दुधारी या गावांत तापासह अन्य साथीच्या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. आरोग्य विभागाने परिसरात सर्वेक्षण केले आहे. परंतु साथीचे आजार आटोक्यात आणण्यासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी/वार्ताहर)अकरा महिन्यांचा चिमुरडा दाखलमिरजेतील नदीवेस, खतीबगल्ली, कवठेएकंद (ता. तासगाव), बनाळी (ता. जत) व आष्टा (ता. वाळवा) येथील पाच नवीन संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. यामध्ये तीन महिलांचा समावेश आहे. खतीबगल्लीतील अकरा महिन्यांचा मुलगा दाखल आहे. त्यास न्यूमोनियाही झाला आहे. त्याच्याही रक्ताचे नमुने तपासणीला पाठविले आहेत. त्यांचा अहवाल येत्या एक-दोन दिवसांत प्राप्त होईल.
स्वाइन फ्लू संशयित महिलेसह दोघांचा मृत्यू
By admin | Published: October 19, 2015 11:32 PM