गावात मध्यवर्ती ठिकाणी श्री चौंडेश्वरीचे पुरातन हेमाडपंथी मंदिर आहे. या मंदिरात श्री चौंडेश्वरी मातेची अष्टभुजायुक्त महिषासुरमर्दिनी रूपातील अखंड पाषाणामधील अत्यंत रेखीव करारी रूपातील स्वयंभू मूर्ती आहे. ग्रामदैवत चौंडेश्वरी तथा अंबाबाई देवीचा 'भावई' हा पारंपरिक उत्सव ज्येष्ठ वद्य दशमी ते आषाढी एकादशीपर्यंत साजरा केला जातो. या उत्सवाला ११०० ते १२०० वर्षांची परंपरा आहे. उत्सवामध्ये सर्व जाती, धर्म, बारा बलुतेदार मानकरी, खेळगडी यांचा समावेश असतो. पुराणकाळात चंड व मुंड हे राक्षस प्रजेस खूप त्रास देत हाेते. देवीने चामुंडा व चंडिका अवतार धारण करून या राक्षसांबरोबर पाच दिवस पाच रात्री युद्ध करून राक्षसांचा वध केला व प्रजेस संकटातून मुक्त करून रक्षण केले, अशी आख्यायिका आहे. या युद्धावेळी राक्षस नाना रूपे घेई. कधी पाण्यात लपून बसे, तर कधी कुपाडीला. देवीनेही तशाच प्रकारे नाना अवतार धारण करून राक्षसाचा शोध घेतला. पाठलाग करून राक्षसाला डाव्या पायाखाली मडके फोडल्याप्रकारे चिरडून ठार केले. भावई या उत्सवामध्ये याचप्रकारे पारंपरिक वेशभूषेमध्ये व संबळ, कैताळ, शिंग, पावा या वाद्यांच्या साथीने दिवटी-पलित्यांच्या उजेडात हा खेळ खेळला जातो.
भावई उत्सवातील प्रमुख खेळ दिवा अर्थात दीपपूजा
पहाटे सर्व खेळगडी मारुती मंदिरात एकत्र जमतात. मातीच्या डेऱ्यामध्ये कणकेचा दिवा तयार करून त्यामध्ये चार वाती लावल्या जातात. गावामध्ये प्रमुख मानकऱ्यांच्या घरी दिव्याची पूजा होते. शेवटी भावकाई मंदिर येथे गतसाली पुरलेला दिवा काढून चालू वर्षीचा दिवा मातीमध्ये पुरला जातो. गतवर्षीच्या दिव्यामधील अंगारा सर्व खेळगड्यांना देऊन गावात वाटला जातो. या अंगाराच्या स्वरूपावरून म्हणजे ओला-सुका, मध्यम ओला यावरून चालू वर्षाच्या पावसाचे भाकीत केले जाते. पूजा करून एक प्रकारची जनजागृती केली जाते. यावेळी पारंपरिक गाणी म्हटली जातात.
कंकण बंधन
दुसऱ्या दिवशी रात्री भावकाई मंदिरासमोर सर्व खेळगडी-मानकरी जमून या उत्सवासाठी प्रतिज्ञाबद्ध होतात. १६ खेळगड्यांना कंकण (लोकरीचे) व मानाचे पान सुपारीचे विडे दिले जातात, तसेच इतर सर्व मानकरी-खेळगडी यांनाही मानाचे विडे देऊन सर्वांना खेळासाठी वचनबद्ध केले जाते. संपूर्ण उत्सव पार पडेपर्यंत व्रतस्थ व तपस्वी योग्याप्रमाणे आचरण करण्याची प्रतिज्ञा केली जाते व दुसऱ्या दिवसापासून प्रत्यक्ष खेळाला सुरुवात होते.
आळुमुळू
दिवसाच्या तिसऱ्या प्रहरी सर्व खेळगडी कुंभारवाडा अथवा थळ येथे एकत्र जमतात. या सोळा खेळगड्यांपैकी एक खेळगडी गावाबाहेर ओढ्याकाठी संपूर्ण काळा पोशाख व तोंडास कापडी बुरखा, असा वेश परिधान करतो. हातामध्ये लिंबाचे मुडगे, झुपके, टापर (फेटा) या पारंपरिक वेशामध्ये कुंभारवाड्यात रंगून बाहेर पडतात. पारंपरिक मार्गाने ओढ्याकाठी जाऊन 'आळूमुळू' रंगवून गावातील ठरावीक मार्गाने प्रमुख मानकऱ्यांच्या घरी जाऊन पूजा घेतात. दैत्याचा शोध घेतात. अळूमुळू हातातील लिंबाच्या मडग्याने सर्वांना मारत दैत्याचा शोध घेते. या खेळावेळी पारंपरिक गाणी म्हटली जातात.
घोडी
याच दिवशी रात्री देवी घोड्याच्या अवतारात दैत्याचा शोध घेण्यासाठी बाहेर पडते. यास 'राअत' असेही संबोधले जाते. यामध्ये सजवलेला लाकडी घोडा व पाठीमागे बोराटीचे शेपूट, अशा वेशभूषेत कुंभारवाडा व सुतारवाड्यातून बाहेर पडून मारुती मंदिरापासून या खेळाची सुरुवात होते. घोड्याच्या पुढे जाधव मानकरी विशिष्ट अशी पारंपरिक गाणी म्हणत असतात, तर मागील बाजूस इतर ग्रामस्थ घोड्याच्या शेपटाच्या काट्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी धडपडत असतात. या घोड्यांची गावामध्ये प्रमुख मानकऱ्याच्या घरी पूजा होऊन मध्यरात्रीपर्यंत या खेळाची सांगता होते.
पिसे
या खेळात पाच खेळगडी पिसे या वेशभूषेत असतात. कमरेपर्यंत चोळणा, कमरेला घंटी, एका हातात उंच काठी, एका हातात लिंबाचा मुडगा, (झुपका) तोंडास काळे फासून हातापायांवर भस्म व हळदीचे पट्टे ओढलेले, डोक्यावर कापसाचे पुंजके, अशा वेशभूषेत गावाबाहेरील मिरज वेस इथून खेळ सुरू हाेताे. खेळगडी दैत्याच्या शोधासाठी बाहेर पडतात. ही ५ पिसे गावात दिवसभर घरोघरी फिरून प्रत्येक घरातील उंबऱ्यावर लिंबाचा मुडगा आपटून गूळ खोबरे घेऊन येतात. सायंकाळी मिरज वेस येथे अग्नी पेटवून जाळ केला जातो. त्यावर उंचावर बांधलेल्या लिंबाच्या डहाळीच्या तोरणाला जाळावरून उडी मारून हातातील काठीने स्पर्श केला जाताे. याला कर तोडणे म्हटले जाते. त्यानंतर या खेळाची सांगता होते.
थळ उठवणे
पिसे या खेळानंतर रात्री सोळा कंकणधारक मानकरी थळ पूजा मांडतात. पूजेस जाण्यापूर्वी थोरात-पाटील यांच्या घरी थळोबा देवासाठी दूध, भात, भाकरी मागून घेतात. नंतर थळोबा मंदिरात जाऊन पूजाअर्चा करून तेथील मानकऱ्यांना पूजेचे विडे दिले जातात.
जोगण्या
भावई उत्सवातील या प्रमुख खेळामध्ये स्वतः देवी आपल्या सैनिक सहकाऱ्यांसह दैत्याच्या शोधासाठी जोगण्यांच्या रूपामध्ये बाहेर पडते. मध्ये एक दमामे-पाटील अर्थात भद जोगणी व दोन सुतार जोगणी मंदिरातून रंगून बाहेर पडतात. कुंभारवाड्यातून रंगून गाव जोगणी यामध्ये सामील होते. या दोघांच्या वेशभूषा पारंपरिक विशिष्ट प्रकारे गडद लाल रंगाची असते. जोगण्याचे पोशाख हे तत्पूर्वी विशिष्ट प्रकारे हाताने शिवून तयार केले जातात. या चार जोगण्यांपैकी तीन जोगण्यांच्या उजव्या हातात तलवार व डाव्या हातात वाटी असते, तर भद जोगणीच्या हातात मातीची कळशी अर्थात भद असते. जोगण्यांच्या हातात दंडात व पायामध्ये भाविकांनी दिलेले दोरे बांधले जातात. हे दोरे भाविक भक्तगण नंतर श्रद्धेने व औक्षण म्हणून गळ्यात हातात बांधतात. या जोगण्यांपुढे रणशिंग, संबळ, चौंडके, कैताळ अशी विविध वाद्ये विशिष्ट लयीत वाजवली जातात. अशा प्रकारे वाद्ये, नगारे, छत्र्या अशा लवाजम्यासह खेळगडी, मानकरी, भक्तगणांसमवेत या जोगण्या परंपरेनुसार ठरावीक मार्गाने जातात. गावात प्रमुख मानकऱ्यांच्या घरी पूजा होते. या जोगण्याच्या प्रथम पूजेचा मान मातंग समाजाला असून त्यानंतर क्रमाने परीट, थोरात, पाटील, कुलकर्णी व महाजन यांच्या पूजा घेतल्या जातात.
लोट
अळूमुळू, घोडी, पिसे, जोगण्या अशा अवतारांतून देवी दैत्याचा शोध घेते, परंतु दैत्य समोरासमोर न येता लपतछपत हुलकावणी देत असतो. तो एका तळ्यात लपून बसलेला आढळल्यानंतर देवी त्यामधील पाणी मडक्याने बाहेर टाकून दैत्यास बाहेर येण्यास भाग पाडते. त्याला ‘मडक्यासारखे चिरडून टाकीन’ असे आव्हान देऊन लोट फोडते. या खेळास लोट असे म्हणतात. प्रतीकात्मक रूपात गाव जोगणी होणारा खेळगडी कुंभार मडक्यामध्ये पाणी घेऊन गांधी चौकात बांधलेल्या लिंबाच्या तोरणाभोवती जमलेले मानकरी व भक्तजनांच्या अंगावर पाणी उडवून पाच फेऱ्या काढतो. शेवटी हातातील मडके उंच फेकतो. यावेळी त्या रूपात दमामे-पाटील खेळगडी घोंगडे पांघरून तोरणाच्या मध्यभागी बसलेला असतो. शेवटच्या पाचव्या फेरीवेळी तो पळून जातो. तिथून देवी दैत्याचा पाठलाग सुरू करते.
मुखवटे
देवी व दैत्य यांच्यातील युद्ध ज्येष्ठ अमावास्येला पहाटे चौंडेश्वरी मंदिरात दोन सुतार खेळगडी पारंपरिक वेशभूषेत रंगून बाहेर पडतात. त्यांच्या डोक्यावर देवीचे मुखवटे अर्थात मखोटे असतात. उजव्या हातात उंच काठी व दुसऱ्या हातात वाटी असते सजून हे दोन खेळ गडी नगारे, रणशिंग, संबळ, चौंडके, कैताळ, पावा अशा वाद्यांच्या गजरात सर्व लवाजम्यासह मंदिरातून दैत्याबरोबर युद्ध करण्यासाठी बाहेर पडतात. यावेळी एक सुतार खेळगडी दैत्य रूपात पारंपरिक वेशभूषेत तयार होतो. त्याच्या कमरेपर्यंत रंगीत चोळणा व डोईवर रंगवलेले सूप असते. मुखवटे रूपातील देवी व आरगडी रूपातील दैत्य यांच्यात समोरासमोर धावा घेऊन युद्ध खेळले जाते व दैत्य मारला जातो. यावेळी धावा झाल्यानंतर मुखवटे उंच उडवून आरोळी गर्जना केली जाते. यास रण शोधणे, असे म्हणतात. मखोट्याच्या धावा व रण झाल्यानंतर दैत्य मारला गेला, म्हणून विशिष्ट अशी पारंपरिक देवीस्तुतीची गाणी म्हटली जातात. 'दैत्य झाले भारी धावुनी आली चौंडेश्वरी', ‘दैत्य धरीला त्यास डाव्या अंगठ्या खाली रगडला’, ‘दैत्याचे केले निर्दालन भक्त जणांचे केले परिपालन’, ‘भगत राजा हर हर हर’, अशा आरोळ्या दिल्या जातात.
पाखर
उत्सवासाठी येणाऱ्या हजारो भाविकांची या धावा पाहण्यासाठी गर्दी झालेली असते. गणपती मंदिरापासून नगरपरिषद ते मारुती मंदिरापर्यंत धावा होताे. धावा झाल्यानंतर दैत्य मारला जाताे. ‘प्रजेचे कल्याण हाेणार, प्रजा सुखी होणार’ या आनंदाप्रीत्यर्थ आरोळ्या ठोकल्या जातात. यास ‘पाखर’ असे म्हणतात. शेवटी संबळ, सिंग यासह विविध वाद्यांच्या गजरात मखोटे रूपातील देवीचे मंदिरात आगमन झाल्यानंतर या खेळाची सांगता होते.
- सुनील कोरे
सचिव, पद्मप्रभू पतसंस्था, आष्टा
- शब्दांकन : सुरेंद्र शिराळकर