सांगली : शिगेला पोहोचलेली उत्सुकता, उमेदवारांच्या हृदयाचे वाढलेले ठोके आणि तर्कवितर्कांच्या गर्दीत आज, शुक्रवारी सांगली लोकसभा मतदार संघातील ऐतिहासिक लढतीचा फैसला होत आहे. अनेक दिग्गज मंत्र्यांची प्रतिष्ठा याठिकाणी पणाला लागल्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. तब्बल ५८ वर्षे काँग्रेसचे वर्चस्व असलेला हा बालेकिल्ला काँग्रेसचे प्रतीक पाटील यांच्या विजयाने अबाधित राहणार, की मोदी लाटेत भाजपचे संजय पाटील यांच्या विजयाने हा बुरुज ढासळणार?, या प्रश्नाचे उत्तर शुक्रवारी दुपारी दीडपर्यंत मिळणार आहे. अनेक ऐतिहासिक घटनांनी ही निवडणूक यंदा गाजली. बालेकिल्ल्यातच काँग्रेसला प्रचंड मेहनत यावेळी घ्यावी लागली. यंदा रिंगणात १७ उमेदवार आहेत. गत निवडणुकीतही सारे विरोधक एकवटले असताना, प्रतीक पाटील यांनी हा बालेकिल्ला राखला होता. गत निवडणुकीत ३९ हजार ७८३ इतके मताधिक्य कमी झाले होते. गतवेळी काँग्रेसच्या वातावरण निर्मितीसाठी पक्षाचे राष्टÑीय नेते राहुल गांधी सांगलीत आले होते. त्यांच्या जाहीर सभेचा परिणाम विजयाच्या गणितावर झाला. यंदा राष्टÑीय स्तरावरील कोणतीही व्यक्ती काँग्रेसच्या प्रचाराला आली नाही. मुख्यमंत्री, जिल्ह्यातील काही मंत्री वगळता स्टार प्रचारकांची कमी जाणवली. दुसरीकडे भाजपने प्रथमच काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात अभूतपूर्व ताकद निर्माण केली. भाजपला संजय पाटील यांच्या माध्यमातून मिळालेला सक्षम उमेदवार, काँग्रेसविरोधी लाट आणि नरेंद्र मोदींच्या सभेने झालेली वातावरणनिर्मिती, यामुळे भाजपने चुरस निर्माण केली. सहजासहजी या मतदार संघाचा निकाल कुणीही सांगावा, अशी परिस्थिती आता राहिलेली नाही. त्यातच नवमतदारांचा वाढलेला मतांचा टक्काही चर्चेचा विषय बनला आहे. दुसरीकडे आम आदमी पार्टी, जनता दल आणि अपक्ष उमेदवारांनीही चांगली लढत दिल्याने, त्यांना मिळणारी मते कोणाच्या पथ्यावर पडणार, याचेही तर्कवितर्क सुरू आहेत. काँग्रेसला प्रथमच यावेळी आघाडी धर्माच्या नावाखाली राष्टÑवादीची ताकद लाभली. त्याचा कितपत फायदा काँग्रेसला होणार, याचेही गणित मांडले जात आहे. काही ठिकाणी राष्टÑवादी नेत्यांनी आघाडी धर्म पाळला नसल्याच्याही तक्रारी आहेत. फायद्या-तोट्याच्या अनेक बाजू दोन्ही उमेदवारांना लाभल्या आहेत. त्यामुळे या मतदार संघातील निकालाबाबत अंदाज करणे कठीण बनले आहे. मोठी चुरस असल्यामुळे यंदा पैजा आणि सट्टाबाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. निवडणूक निकालापूर्वीपर्यंत हा बाजार तेजीत राहणार आहे. सांगली लोकसभा मतदार संघाच्या इतिहासात आजवर इतकी चुरस कधीही पहावयास मिळाली नाही. त्यामुळेच जनतेला, राजकीय नेतेमंडळी, कार्यकर्त्यांना आणि राज्यातील दिग्गज नेत्यांना याठिकाणच्या निकालाची उत्सुकता लागली आहे. केंद्रीय मंत्री म्हणून स्वत: प्रतीक पाटील यांची, तर गृहमंत्री आर. आर. पाटील, वनमंत्री पतंगराव कदम आणि ग्रामविकासमंत्री जयंत पाटील अशा दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळेच संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. त्याशिवाय सांगली लोकसभा मतदार संघाच्या निकालावर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. याचे परिणाम विधानसभा निवडणुकीवरही होणार आहेत. (प्रतिनिधी)
यंदा प्रतीक की संजयकाका..? सांगली लोकसभा : आज होणार फैसला; सांगलीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष
By admin | Published: May 15, 2014 11:43 PM