सांगली : घरगुती गॅस सिलिंडरच्या दरामध्ये वाढ झाल्याच्या निषेधार्थ सांगलीत मदनभाऊ युवा मंचाच्यावतीने गुरुवारी अनोखे आंदोलन करण्यात आले. युवा मंचच्यावतीने गॅस सिलिंडरची प्रतिकात्मक अंतिम यात्रा काढत अमरधान स्मशानभूमीत अंत्यसंस्कार विधीही करण्यात आला.युवा मंचचे अध्यक्ष आनंद लेंगरे, नगरसेवक संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. मंचच्या कार्यकर्त्यांनी सिलिंडरची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली. त्यानंतर अमरधान स्मशानभूमीत विधीवर अंत्यसंस्कारही करण्यात आले.
यावेळी लेंगरे म्हणाले की, केंद्र सरकारच्या महागाईला कंटाळून घरगुती गॅस सिलेंडर टाकीने आत्महत्या केली आहे. २०१४ मध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा दर ४१० रुपये होते. आता ११०० रुपये इतके आहे. अच्छे दिनचे स्वप्न दाखवित सत्तेत आलेल्या भाजपच्या सत्ताकाळात महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. उज्वला सिलिंडरधारकावर वाढत्या दरामुळे चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. गेल्या दोन वर्षापासून एकही रुपया अनुदान दिलेले नाही. या महागाईविरोधात युवा मंचच्यावतीने आंदोलन करण्यात आले.यावेळी अविनाश जाधव, कय्युम पटवेगार, मयूर बांगर, अमित लाळगे, तौफिक बिडीवाले, धनंजय खांडेकर, विशाल पडुळकर, दिनेश सादिगले, नितीन भगत, अवधूत गवळी, तौफिक कोतवाल, अय्याज मुजावर, शानुर शेख, अक्षय दोडमणी, शेखर पाटील, कल्पना देवकर, रेखा भुई, सुलभा रास्ते, विमल तापेकर, शकुंतला मोरे, रेखा मोरे, निर्मला घाडगे, गीता भोसले, पुष्पा पाटोळे उपस्थित होते.