आष्टा : भारतीय मजदूर संघाच्या संलग्न सांगली जिल्हा बांधकाम कामगार महासंघाच्या वतीने बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांबाबत सोमवार (दि. ४) बांधकाम कामगार सहाय्यक आयुक्त कार्यालयासमोर एकदिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष अनुप वाडेकर यांनी दिली.
अनुप वाडेकर म्हणाले, सहाय्यक कामगार आयुक्त सांगली यांना कामगारांच्या विविध मागण्यांबाबत वेळोवेळी निवेदने देण्यात आलेले आहे. मात्र, फक्त आश्वासन दिले जात आहे. परंतु न्याय मिळत नाही. कामगारांच्या विशेष नोंदणी अभियानांतर्गत करण्यात आलेली नोंदणीची तपासणी करून कामगारांची पुस्तके ऑफलाईन पद्धतीने द्यावीत.
नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांची शिष्यवृत्तीचे अर्ज निकालात काढण्यात यावेत तसेच औजारे खरेदी साहित्यासाठी ५ हजार रुपयाचे प्रलंबित अर्ज मार्गी लावावेत. मंडळाचे सर्व काम कामगार सुविधा केंद्रांमधून करण्यात यावे. यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला सर्व कामगार बंधू-भगिनींनी उपस्थित राहण्याचे आवाहन अनुप वाडेकर यांनी केले आहे.