सांगली : खून करण्यासाठी अपहरण करणे, घातक शस्त्राने दुखापत करणे, सरकारी नोकरावर हल्ला करणे, घरफोडी, जबरी चोरीसारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सांगलीतील तबरेज तांबोळी टोळीला दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले. पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी याबाबत आदेश दिले.टोळीप्रमुख तबरेज बाबू तांबोळी (वय ३२, रा. नुराणी मशिदजवळ, सांगली), सदस्य मोहम्मदजैद फारूख पखाली (वय २१, मुजावर प्लॉट, बसस्थानकजवळ, सांगली), किरण रूपेश भंडारे (वय २४, रा. रमामातानगर), कपिल सुनील शिंदे (वय २५, रा. सम्राट व्यायाम मंडळजवळ), रोहित बाळासाहेब कांबळे (वय २१, गणेशनगर, गोंधळे प्लॉट) यांना सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.
अधिक माहिती अशी, टोळीप्रमुख तांबोळी, सदस्य पखाली, भंडारे, शिंदे, कांबळे या टोळीविरूद्ध २०२८ ते २०२४ या काळात संगनमत करून खुनासाठी अपहरण करणे, घातक शस्त्राने मारहाण करणे, शस्त्राचा धाक दाखवून दुखापत करणे, जबरी चोरी, बंदी आदेशाचे उल्लंघन करणे, घरात घुसून शिवीगाळ व मारहाण करणे, दमदाटी करणे, रिक्षा चोरी असे शरीराविरूद्ध व मालमत्तेविरूद्धचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या टोळीने परिसरात दहशत निर्माण केली होती. टोळीविरूद्ध सांगली शहर पोलिसांनी हद्दपारीचा प्रस्ताव अधीक्षक घुगे यांना सादर केला होता.अधीक्षक घुगे यांनी हा प्रस्ताव चौकशीसाठी उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्याकडे पाठवला. उपअधीक्षक जाधव यांनी चौकशी करून अधीक्षक घुगे यांना अहवाल सादर केला. अधीक्षक घुगे यांनी टोळीविरूद्ध दाखल गुन्हे, सद्यस्थिती अहवाल, प्रतिबंधात्मक कारवाई, हालचाली आदी बाबी विचारात घेतल्या. हद्दपारीच्या प्रस्तावाबाबत सलग सुनावणी घेऊन टोळीला सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार केले.
अधीक्षक घुगे, अप्पर अधीक्षक रितू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे, पोलिस निरीक्षक संजय मोरे, उपनिरीक्षक सिद्धाप्पा रूपनर, कर्मचारी अमर नरळे, दिपक घट्टे, श्रीपाद शिंदे यांनी कारवाईत भाग घेतला.
टोळ्यांवर करडी नजरलोकसभा निवडणूक तसेच आगामी सण, उत्सव काळात टोळीने गुन्हे करणाऱ्यांवर बारकाईने नजर ठेवली जाणार आहे. या टोळ्या नेस्तनाबूत करण्यासाठी कडक कारवाई करण्याचा इशारा अधीक्षक घुगे यांनी दिला आहे.