लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : चार जिल्ह्यातून तडीपार असताना लिंगनूर (ता. मिरज) येथे फिरणाऱ्या गुन्हेगारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. प्रवीण रावसाहेब सुतार (२२, रा. पाटील वस्ती, लिंगनूर) असे त्याचे नाव असून त्यास मिरज ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
जिल्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेऊन त्यांच्यावर कडक कारवाईच्या सूचना पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिल्या आहेत. त्यानुसार एलसीबीचे पथक शुक्रवारी मिरज भागात गस्तीवर होते. यावेळी प्रवीण सुतार हा लिंगनूर येथील बसस्थानकाजवळ थांबल्याची माहिती मिळाली. पथकाने तातडीने तिथे जात त्यास ताब्यात घेतले. त्याने कोणतीही परवानगी न घेताच जिल्ह्यात प्रवेश केल्याचे पोलिसांना सांगितले. सांगलीसह सातारा, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यातून त्यास तडीपार करण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली महादेव धुमाळ, किशोर कदम, राहुल जाधव यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.