यवतमाळ :
उत्सवाचे फलक लावण्यावरून चाैघांनी वाद घातला. इतकेच नव्हे तर हे फलक फाडून शेजाऱ्याला शिवीगाळ सुरू केली. काय प्रकार आहे, हे पाहण्यासाठी घराबाहेर आलेल्या युवकावर चाकूने हल्ला केला. पाठीत चाकू खुपसातच त्या युवकाने चाकू हाताने घट्ट पकडून ठेवला. त्यामुळे हल्लेखाेराला दुसरा वार करण्याची संधी मिळाली नाही. तेवढ्यात कुटुंबातील इतर सदस्य धावून आले, त्यांनी जखमीला चाकूसह थेट शासकीय रुग्णालयात दाखल केले. हा थरार शनिवारी दुपारी ३.३० वाजता लाेहारा येथील शिवाजीनगरात घडला.
दीक्षित विजय हिरणवाडे (३८, रा. रामनगर लाेहारा) असे चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. हा परिसरात माेलमजुरी करणाऱ्या वर्गाचा आहे. येथे यंदा रामनवमी माेठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावरूनच येथे वाद पेटला आहे. उत्सवासाठी लागलेला फलक फाडण्यात आला. त्यावेळी दीक्षित हा घरी जेवण करत हाेता. हल्लेखाेरांनी त्याला आवाज देऊन बाहेर बाेलावले, काय झाले याची माहिती नसल्याने दीक्षित विचारपूस करत असतानाच त्याच्यावर पाठीमागून चाकूने हल्ला करण्यात आला. दीक्षितने पाठीत खुपसलेला चाकू घट्ट धरून ठेवल्याने हल्लेखाेराला दुसरा वार करता आला नाही. आरडओरडा ऐकून दीक्षितचे नातेवाईक घटनास्थळावर पाेहाेचले, त्यामुळे हल्लेखाेरांनी तेथून पळ काढला. जखमी दीक्षितला तातडीने दुचाकीवरून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या पाठीच्या खालच्या भागात चाकू रुतला आहे. ताे बाहेर काढण्यासाठी डाॅक्टरांनी तातडीने शस्त्रक्रियेला सुरुवात केली. वृत्त लिहिस्ताेवर ही शस्त्रक्रिया सुरूच हाेती. या प्रकरणात चाैघांवर संशय व्यक्त केला जात असून, घटनेचा व्हिडीओ सुद्धा व्हायरला झाला आहे.