प्रताप महाडिक । लोकमत न्यूज नेटवर्ककडेगाव : कडेगाव, पलूस, खानापूर आणि तासगाव तालुक्यातील दुष्काळी भागाला वरदायिनी ठरलेल्या ताकारी योजनेची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी अजूनही तब्बल ५३३ कोटी रुपये इतक्या निधीची गरज आहे. १,१७८ कोटींचा चतुर्थ सुधारित प्रकल्प अहवाल योजनेकडून राज्य शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. ताकारी योजनेवर आतापर्यंत झालेला ६४५ कोटींचा खर्च व चौथ्या अहवालानुसार यापुढे मिळणारा ५३३ कोटींचा निधी अशाप्रकारे योजना आता ११७८ कोटी इतक्या खर्चाची होत आहे. ताकारी योजनेचे १०८ कि.मी. पुणदीपर्यंतचे (तालुका तासगाव) मुख्य कालव्याचे काम पूर्ण झाले आहे. सद्यस्थितीत ताकारी योजना ९ हजार ५०० हेक्टर लाभक्षेत्राला पाणी देत आहे. १०८ ते १४४ कि.मी. अशा ३६ कि.मी. अंतरातील मुख्य कालवा तसेच चिंचणी भरण कालवा अस्तरीकरण, सोनसळ डावा कालवा, वितरिका आणि उपवितरिका आदी अपूर्ण असलेल्या कामांसाठी तसेच प्रकल्पासाठी भूसंपादन केलेल्या जमिनीचा मोबदला संबंधित शेतकऱ्यांना देण्यासाठी निधी मंजूर होणे आवश्यक आहे. निधी मंजूर होऊन अपूर्ण कामे पूर्ण झाली, तर २७ हजार ४३० हेक्टर इतके लाभक्षेत्र ओलिताखाली येणार आहे. आतापर्यंत ताकारी योजनेवर ६४५ कोटी खर्च झाला आहे.योजनेला पहिल्या प्रकल्प अहवालापासून आजवर टप्प्या-टप्प्याने निधी मिळत गेला. आतापर्यंत योजनेला मिळालेल्या निधीतून १०८ कि.मी. लांबीचा मुख्य कालवा तसेच ११ कि.मी. लांबीचा चिंचणी भरण कालवा, २३ किलोमीटर लांबीचा सोनसळ डावा कालवा तडसर हद्दीपर्यंत यासह योजनेचे ४ टप्पे, भूमिसंपादन आदी कामांसाठी ६४५ कोटी इतका खर्च झाला आहे. आजअखेर जवळपास ९,५०० हेक्टर इतक्या शेतजमिनीला पाणी देण्यात आले आहे.ही योजना चार टप्प्यात दुष्काळी भागाला ९.३४ टीएमसी इतके पाणी कृष्णा नदीतून उचलून देणार आहे. या योजनेच्या उर्वरित कामासाठी ५३३ कोटींचा निधी मिळाल्यास योजना पूर्णत्वाकडे जाईल आणि सद्यस्थितीला तसेच वंचित लाभक्षेत्राचे नंदनवन करेल. प्रधानमंत्री योजनेत समावेशाने दिलासा मागीलवर्षी ताकारी तसेच म्हैसाळ योजनेचा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करण्यात आलेला आहे. चौथ्या सुधारित प्रकल्प अहवालास राज्य शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर केंद्र सरकारच्या या योजनेतूनही ताकारी प्रकल्पासाठी भरीव निधी मिळेल. देशातील अपूर्ण सिंचन योजना येत्या ४ वर्षांत पूर्ण करण्याचे प्रधानमंत्री सिंचन योजनेचे उद्दिष्ट आहे. यामुळे ताकारी योजनेला दिलासा मिळाला आहे.चौथ्या प्रकल्प अहवालास लवकरच मंजुरी ताकारी योजनेचा शासनाकडे सादर झालेला चौथा सुधारित प्रकल्प अहवाल मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. या अहवालास मंत्रिमंडळ बैठकीत लवकरच मान्यता मिळणार आहे, अशी माहिती सूत्राकडून मिळाली.
‘ताकारी’ला हवेत ५३३ कोटी
By admin | Published: May 11, 2017 11:20 PM