सांगली : ताकारी, म्हैसाळ, टेंभू आणि उरमोडी सिंचन योजनांची टंचाई काळातील ३६ कोटी ७५ लाख ७० हजार रुपयांची बिले शासनाने काढली आहेत. यासंदर्भातील आदेश नुकताच जारी करण्यात आला. पुणे विभागीय आयुक्तालयाकडे निधी जमा झाला असून, तो संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तात्काळ वर्ग करण्याचे आदेश आहेत.
२०१७-१८ व २०१८-१९ या काळात टंचाईतून उपसा केलेल्या पाण्याच्या वीजबिलांपोटी हा निधी देण्यात आला आहे. मंत्रिमंडळ उपसमितीने जुलै महिन्यातील बैठकीत मंजूर केला होता. त्यानुसार १८ कोटी रुपयांचा पहिला हप्ता ३१ जुलैला वितरित झाला होता. उर्वरित १८ कोटी ३० लाख ६५ हजारांचा निधी पुणे आयुक्तालयाकडे नुकताच जमा करण्यात आला. उर्वरित ४५ लाख ५ हजार रुपये शेवटच्या टप्प्यात दिले जातील, त्यासाठी प्रस्ताव सादर करण्याची सूचना आयुक्तांना दिली आहे.
सांगली व सातारा जिल्ह्यांत २०१८-१९ मध्ये पाऊस लांबल्याने तसेच कमी प्रमाणात झाल्याने टंचाईस्थिती निर्माण झाली होती. पाणीपुरवठ्यासाठी सिंचन योजना कार्यान्वित केल्या होत्या. त्यातून ओढे, नाले, तलाव, बंधारे व पाणीपुरवठ्याचे स्त्रोत भरुन घेतले होते. त्याची वीजबिले शासनाकडे प्रलंबित होती. टंचाईचा उपसा असल्याने त्याची बिले शेतकऱ्यांकडून मिळणार नव्हती. आता पैसे मिळाल्याने त्यात वीजबिले भागविली जातील. योजनांचा थकबाकीचा आकडा अवाढव्य दिसणार नाही.
चौकट
योजनानिहाय रक्कम अशी
म्हैसाळ योजना (मार्च २०१८ ते सप्टेंबर २०१९, तीन आवर्तने ) - १६ कोटी ७३ लाख ९९ हजार. ताकारी योजना (एप्रिल २०१८ ते मे २०१९, चार आवर्तने) - ३ कोटी ८१ लाख ८९ हजार रुपये. टेंभू योजना (एप्रिल २०१८ ते जून २०१९, चार आवर्तने) - १० कोटी ९१ लाख ८२ हजार. उरमोडी योजना ( २०१८-१९) - ५ कोटी २८ लाख रुपये.
--------