प्रताप महाडिककडेगाव : ५३ हजार ८८४ अश्वशक्तीच्या ताकारी उपसा सिंचन प्रकल्प योजनेस प्रतिदिन ४१ मेगावॅट वीज लागते. या योजनेचे १ रुपये १६ पैसे प्रतीयुनिट या सवलतीच्या दराने प्रतिदिन सुमारे ८ लाख वीजबिल येते. ताकारी योजनेची आवर्तने वार्षीक सरासरी १४०-१६० दिवसांपर्यंत चालतात. या आवर्तन परिचलनासाठी दरवर्षी सुमारे १३-१४ कोटी रुपये वीजबिल महावितरणला द्यावे लागते. त्या प्रमाणात पाणीपट्टीची रक्कम शेतक-यांकडून जमा होणे आवश्यक असते. परिणामी यामुळे काहीवेळा वीजबिल थकबाकीचा प्रश्न योजनेपुढे उभा राहतो. यावर मात करण्यासाठी ही योजना सौर उर्जेवर चालवणे भविष्यात अतिशय गरजेचे आहे.
या योजनेचे सद्यस्थितीत वीजबिल थकीत नसले तरी यापूर्वी अनेकदा ही योजना वीजबिल थकबाकीच्या संकटात अडकली होती. मात्र राज्य शासनाच्या मदतीने आणि साखर कारखान्यांनी पाणी पट्टी वसुलीस सहकार्य केल्यामुळे वेळोवेळी या संकटातून ताकारी योजना बाहेर पडली. डॉ. पतंगराव कदम मदत व पुनर्वसन मंत्री असताना दुष्काळी स्थितीत उन्हाळी आवर्तनाची वीज बिले राज्य शासनाने टंचाई उपाययोजना निधीतून भरून योजनेवरील वीज बिल थकबाकीचा बोजा कमी केला. यामुळे मार्ग निघत गेले.काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात २०११ मध्ये वीजबिल सवलत योजना सुरू झाली तेंव्हापासून वेळोवेळी ही मुदतवाढ मिळत आहे.अन्यथा वाढीव दराने सद्यस्थितीत येणाऱ्या विजबिलाच्या पाचपट वीजबिल येईल आणि ८१-१९ फॉर्म्युला असूनही ही योजना केवळ वीजबिल थकबाकीमुळे बंद पडेल.
विजबिलाच्या ८१ /१९ फॉर्म्युल्यामुळे दिलासा २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात युती सरकार सत्तेत आल्यानंतर राज्य शासनाने ८१ टक्के व शेतकऱ्यांकडून १९ टक्के वीजबिल रक्कम भरण्याचा निर्णय झाला. याबाबतचा अध्यादेश जानेवारी २०१८ ला काढण्यात आला.
वीजबिल सवलत योजनेस हवी मुदतवाढ २०२३ मध्ये सिंचन योजनांची वीजबिल सवलत रद्द करणेत आल्यामुळे वीज बिलात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती. सवलतीच्या १ रुपये १६ पैसे दराने मिळणार विज ५:२६ पैसे दराने झाली होती.मात्र जनरेट्यामुळे व लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे वीजबिलाच्या सवलतीस राज्य सरकारने ३१मार्च २०२५ पर्यंत मुदतवाढ दिली.आता ३१ मार्च नंतर पुन्हा मुदतवाढ मिळावी अशी अपेक्षा आहे.
विश्वजित कदम, सुहास बाबर व रोहित पाटील यांच्यावर भिस्त कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत ताकारी व म्हैसाळ या योजनांचा समावेश आहे.यातील म्हैसाळ योजनेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम मार्गी लागले आहे. ताकारी योजनेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचा प्रस्ताव महाजनकोकडे पाठविला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळविण्यासाठी आमदार विश्वजित कदम,आमदार सुहास बाबर आणि आमदार रोहित पाटील यांनी पाठपुरावा करावा अशी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.