लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : आमदार अनिल बाबर यांच्या आदेशानंतर ताकारी योजनेचे पाणी पाटबंधारे विभागाने आळसंद तलावात सोडल्याने विटा शहरात गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेली पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
बाबर यांनी मंगळवारी आळसंद तलावाची पाहणी करून पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता मिलिंद नाईक यांच्यासमवेत बैठक घेऊन ताकारी योजनेचे पाणी आळसंद तलावात तातडीने सोडून तलाव पाण्याने पूर्ण भरून घ्यावा, अशी सूचना केली.
विटा शहराला घोगाव पाणी योजनेतून पिण्याचे पाणी पुरविले जाते. त्याला पूरक योजना म्हणून आळसंद तलावाचे पाणी जलशुद्धीकरण केंद्रात घेत आहे. मात्र, घोगाव ते आळसंद जलशुद्धीकरण केंद्र या टप्प्यात मोठी गळती असल्याने दहा लाख लिटर पाणी वाया जात आहे. आळसंद तलावातही पाणी नसल्याने विटा शहराला पाणीटंचाई निर्माण झाल्याचे मुख्याधिकारी अतुल पाटील यांनी विरोधी नगरसेवक अमोल बाबर, अमर शितोळे यांना सांगितले होते.
परिणामी विटा शहरात चार दिवसांनी पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत होता. नगरसेवक बाबर व शितोळे यांनी ताकारी योजनेचे पाणी आळसंद तलावात सोडून विटेकर नागरिकांचा पिण्याचा पाणीप्रश्न सोडवावा, अशी विनंती आ. बाबर यांना केली होती.
त्या पार्श्वभूमीवर आ. बाबर यांनी मंगळवारी आळसंद तलावाची पाहणी केली. अधीक्षक अभियंता नाईक यांच्याशी बैठक घेऊन आळसंद तलावातून विटा शहराला पिण्याचा पाणीपुरवठा होत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विटेकर नागरिकांचे पिण्याच्या पाण्यापासून मोठे हाल सुरू आहेत. आळसंद तलावातून विटा शहरासह ग्रामीण भागातील काही गावांनासुद्धा पिण्याचे पाणी पुरविले जाते. त्यामुळे ताकारी योजनेचे पाणी आळसंद तलावात तातडीने सोडून तलाव पूर्ण क्षमतेने भरून घ्यावा, अशी सूचना केली. नाईक यांनी ताकारी योजनेचे पाणी सोडण्याची तातडीने कार्यवाही केली जाईल, असे सांगितले. त्यानुसार मंगळवारी ताकारी योजनेचे पाणी आळसंद तलावात सोडले आहे. यामुळे विटा शहराचा पिण्याचा पाणीप्रश्न संपुष्टात येणार असून, आ. अनिल बाबर यांच्यामुळे विटेकर नागरिकांना दिलासा मिळाला आहे.