प्रताप महाडिक
कडेगाव : ताकारी उपसा सिंचन प्रकल्प योजनेच्या लाभक्षेत्राला आता बंदिस्त पाईपद्वारे पाणी मिळणार आहे. या कामांसाठी एकंदरीत २१६ कोटी सहा लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या २०२२-२३ च्या प्रस्तावित निविदांच्या प्रमाणसूचीनुसार ताकारी उपसा सिंचन प्रकल्प योजनेच्या २० हजार ६०० हेक्टर इतक्या लाभक्षेत्र विकासाची कामे होणार आहेत. यासाठी १२२ कोटी २ लाख २ हजार इतक्या निधीची तरतूद केली आहे. १०० हेक्टरपेक्षा कमी लाभक्षेत्राला पाणी देणाऱ्या सर्व वितरिका बंदिस्त पाईपलाईनमध्ये रूपांतरित होणार आहेत. यासाठी ३२ कोटी २७ लाख इतक्या निधीची तरतूद आहे. याशिवाय १०० हेक्टरपेक्षा जास्त लाभक्षेत्राला पाणी देणाऱ्या वितरिकांचे अस्तरीकरण होणार आहे. यासाठी ४० कोटी १३ लाख इतक्या निधीची तरतूद केली आहे.ताकारी उपसा सिंचन योजनेच्या अंतर्गत वाळवा तालुक्यातील दुधारी, रेठरे हरणाक्ष, भवानीनगर, लवणमाची व किल्लेमच्छिंद्र या गावांतील वंचित असलेल्या ५७४.६४ हेक्टर इतक्या वंचित क्षेत्रासाठी वितरण व्यवस्था करण्यासाठी बंदिस्त पाईपलाईन कामासाठी २१ कोटी ६४ लाख इतक्या निधीची तरतूद आहे.बंदिस्त वितरण प्रणालीमुळे गळती व बाष्पिभवन टळल्याने ४० ते ५० टक्के पाण्याची बचत होणार आहे. तसेच पाण्याची चोरी टाळता येईल. जमिनीखालून पाईपलाईन टाकली जाईल. त्यामुळे भूसंपादनाची गरज भासणार नाही. त्यामुळे भूसंपादनाचा द्यावयाचा ५ पट खर्च वाचणार आहे. उपलब्ध पाण्याद्वारे दुप्पट सिंचन क्षमता निर्माण होईल.
पाचवा अहवाल मंजूरताकारी म्हैसाळ योजनेचा ८ हजार २७२ कोटी ३६ लाख रकमेचा पाचवा सुधारित प्रकल्प अहवाल डिसेंबर २०२२ मध्ये मंजूर झाला. यापैकी ताकारी योजनेसाठी १३२२ कोटींची मंजुरी आहे. ताकारी योजनेसाठी ९५० कोटी रुपये इतका खर्च झाला आहे. अजूनही ३७२ कोटी रुपये इतका निधी मिळणार आहे. यामुळे बंदिस्त पाईपलाईन, अस्तरीकरण या कामांसाठी आवश्यक असलेल्या २१६ कोटींच्या निधीचा मार्ग मोकळा झाला आहे.