सांगली : मिरज येथील आशा वर्कर्सला मारहाण केलेल्या कुरणे कुटुंबावर तातडीने कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा लाल बावटा आशा व गटप्रवर्तक युनियनचे सचिव कॉ. उमेश देशमुख यांनी दिला आहे.
यासंदर्भात दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, मिरज शहरातील आशा वर्कर फरिदा निशानदार (रा. कोल्हापूर चाळ, मिरज) यांनी कोविड रुग्णाची माहिती वरिष्ठांना दिली म्हणून त्यांच्या शेजारी राहणाऱ्या कुरणे कुटुंबाने ऑगस्ट २०२० मध्ये त्यांना मारहाण केली होती. त्यावेळी पोलिसांनी त्यांना समज दिली होती. परंतु, त्यानंतर सातत्याने कुरणे कुटुंब फरिदा निशानदार व त्यांच्या कुटुंबास शिवीगाळ करून त्रास देत आहे.
दोन दिवसांपूर्वी पुन्हा निशानदार यांना कुरणे कुटुंबाकडून मारहाण झाली आहे. त्यावेळी पोलिसांनी कोणतीही दखल न घेता उलट संबंधित आशा वर्कर्सवरच कारवाई केली आहे. ही बाब गंभीर आहे. पोलिसांनी ताबडतोब हस्तक्षेप करून संबंधित कुरणे कुटुंबावर कडक कारवाई करावी व आशा वर्कर्सवरील कारवाई रद्द करावी, अन्यथा पोलिसांविरोधात आम्हाला आंदोलन करावे लागेल, असा इशारा दिला आहे.