म्हैसाळ : गृह अलगीकरणापेक्षा संस्थात्मक विलगीकरणातच रुग्ण दाखल केले पाहिजेत. मात्र, अपवादात्मक परिस्थितीत गृह अलगीकरण करण्यात आल्यास याचे नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी प्रशासनाला दिल्या.
वाढत्या काेराेना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चाैधरी यांनी शनिवारी म्हैसाळ, बेडग, आरग येथील ग्रामपंचायतींमध्ये आढावा बैठका घेतल्या. यावेळी कोरोना नियंत्रित करण्याबाबत चर्चा झाली. चौधरी म्हणाले, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष नियोजन करणे गरजेचे आहे. रुग्णवाढ रोखायची असेल तर कटू निर्णय घ्यावे लागतील. ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. शासकीय कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी यांनी एकत्रित काम केल्यास आपण रुग्णवाढीला आळा घालू शकतो.
यावेळी उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार डी. एस. कुंभार, मिरज ग्रामीणचे पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी विजय सावंत उपस्थित होते.