सांगली : जिल्ह्यातील चालक कम वाहक पदावरील ३७० एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांपासून नियमित वेतनाच्या न्याय हक्कापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवले आहे. यास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करत महाराष्ट्र एसटी कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगली विभागीय कार्यालयासमोर निदर्शने दिली. प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या.महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे प्रमुख मार्गदर्शक बजरंग पाटील, विभागीय अध्यक्ष प्रकाश हंकारे, विभागीय सचिव महेश पाटील, विभागीय सहसचिव सुभाष थोरात यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. एसटी महामंडळाचे सांगली विभागाचे विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांना मागण्याचे निवेदन दिले. तसेच चालक कम वाहकपदावरील कर्मचाऱ्यांना गेल्या सहा महिन्यांपासून हक्कापासून वंचित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.प्रकाश हंकारे म्हणाले की, रोजंदारी काम करून न्यायी हक्काने ते कायम सेवेत येणार आहेत. तरीही या कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्कापासून सहा महिने वंचित ठेवले आहे. आज ते कर्मचारी अत्यंत आर्थिक अडचणीतून जात आहेत. एकीकडे वाढती महागाई आणि अपुऱ्या पगारात काम करावे लागत आहे. कमी भत्ता मिळत असल्यामुळे मुक्कामाच्या ठिकाणी अर्धपोटी आणि उपाशीपोटी राहून सेवा करावी लागत आहे. तरीही एसटी महामंडळाचे अधिकारी आणि पर्यवेक्षक आजारी असले तरी कर्मचाऱ्यांच्या रजा नाकारत आहेत. या सर्व प्रश्नांवर प्रशासनाने तोडगा काढला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.आंदोलनात निरंजन ताटे, विभागीय उपाध्यक्ष शिवाजी पाटील, युवराज शिंदे, राजू नंदीवाले, प्रसाद खंदारे, संदीप क्षीरसागर, किरण मगदूम, अनिल माने, सुनील मदने, हनुमंत कोळी, संग्राम खांबे, संदीप कदम आदींसह शेकडो कर्मचारी आंदोलनात सहभागी होते.
सहा एप्रिलपर्यंत नियमित सेवेचे प्रस्ताव मंजूरएसटी कामगार सेनेच्या आंदोलनानंतर सांगली विभागाचे विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी आंदोलकांशी चर्चा करून त्यांचे प्रश्न जाणून घेतले. त्यानंतर त्यांनी एसटीचे चालक कमवाहक पदावरील पात्र कर्मचाऱ्यांचे दि. ६ एप्रिलपूर्वीच कायम सेवेत घेण्याचे प्रस्ताव मंजूर करण्यात येतील. गरजेनुसार कर्मचाऱ्यांना रजाही देण्यात येतील, असे आश्वासनही त्यांनी संघटनेचे विभागीय अध्यक्ष प्रकाश हंकारे यांना दिले.