इस्लामपूर : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याबरोबर छेडछाड करून नावाचे फलक लावण्याच्या उद्देशाने झालेला हा प्रकार गंभीर आहे. त्यामुळे प्रशासनाने संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी व अपक्ष आघाडीच्या नगरसेवकांनी केली आहे.
याबाबतचे निवेदन पोलीस उप-अधीक्षक यांना देण्यात आले आहे. या निवेदनामध्ये शहरामध्ये नगरपालिकेच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा परिसर सुशोभित करण्यात आला आहे. उद्या होणाऱ्या १३० व्या जयंतीच्या निमित्ताने पालिकेने पुतळ्याची रंगरंगोटी व इतर कामे पूर्ण केली आहेत.
मात्र रात्री ९ ते ११ या दरम्यान नगरसेवक वैभव पवार, कोमल बनसोडे, माजी नगरसेवक भास्कर कदम, आर्किटेक्ट विद्याधर ठोमके कामगारांच्या मदतीने नावाच्या पाट्या लावत होते. या कामाला नगरपालिकेची परवानगी घेतलेली नव्हती किंवा तसा ठरावही मंजूूर केलेला नव्हता. सत्ताधारी आघाडीसह राष्ट्रवादी व अपक्ष आघाडी नगरसेवकांची फलकावरती नावे घालताना पूर्व परवानगी घेतली नव्हती. यामध्ये एक फलक नगराध्यक्षांच्या नावाचा होता. त्यामुळे या कामाला त्यांचीही फूस आहे, असे वाटते. हा सर्व प्रकार गंभीर आहे. त्यामुळे प्रशासनाने संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी विश्वनाथ डांगे, शहाजी पाटील, अरुण कांबळे, दादासाहेब पाटील यांनी केली आहे.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, नगरसेवक खंडेराव जाधव, डॉ. संग्राम पाटील, सुनीता सपकाळ, जयश्री पाटील, सदानंद पाटील, हिंदूराव माळी उपस्थित होते.