सांगली : खरेदीदारांकडून वेळेत पेमेंट येत नसल्यामुळे अडते व व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना बेदाण्याचे पैसे देण्यास विलंब होत आहे. यामुळे अडचणी निर्माण होत असून खरेदीदार व्यापाऱ्यांकडून ४० दिवसात पेमेंट न आल्यास ‘त्या’ व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या बाजार समिती प्रशासन व अडते-व्यापाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी बाजार समितीने ठाम भूमिका घेत तोडगा काढावा, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली. पेमेंटच्या विलंबाबाबत समितीने बेदाणा व्यापारी व अडते यांची शुक्रवारी बैठक बोलावली होती. बाजार समितीचे सचिव प्रकाश पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. खरेदीदार व्यापाऱ्यांकडून अडत्यांना ७५ दिवसांपर्यंत उशिरा रक्कम मिळत आहे. ३५ ते ४० दिवसात रक्कम देण्याचा नियम असताना, रक्कम उशिरा मिळत असल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. बाजार समितीने याबाबत तोडगा काढावा, अशी मागणी यावेळी अडते-व्यापाऱ्यांनी केली. यावेळी तारीख ते तारीख पेमेंट मिळावे, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली. ८० ते ९० दिवसात जर पेमेंट मिळणार असेल, तर सौदे बंद करण्याचा इशाराच यावेळी व्यापाऱ्यांनी दिला. बाजार समितीने याबाबत ठाम भूमिका घ्यावी, अशी मागणीही व्यापाऱ्यांनी केली. गुळाची रक्कम १५ दिवसात येते, हळदीचे पैसे ३० दिवसात येतात, तर बेदाण्याचीच रक्कम ७५ दिवसांपर्यंत उशिरा का येते? असा सवालही व्यापाऱ्यांनी उपस्थित केला. सांगली बाजार समितीत स्वतंत्र ‘बॅन कमिटी’ स्थापण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला. यावेळी बाजार समितीचे सचिव प्रकाश पाटील यांनी, ठरलेल्या वेळेत व्यापाऱ्यांची रक्कम न देणाऱ्या खरेदीदार व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. शनिवारी पुन्हा सभापती संतोष पाटील यांच्या उपस्थितीत यावर सर्वमान्य तोडगा काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
बेदाणा व्यापाऱ्यांवर कारवाई करणार
By admin | Published: April 29, 2016 11:19 PM